
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील फिजीशीयन, न्युरोलॉजीस्ट, हृदयरोग तज्ञ व इतर रिक्त पदे आणि गैरसोयी दुर करण्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी शासनाकडून आरोग्य मंत्र्यांसह बैठकीच आश्वासन दिले होते. दोन वेळा बैठक बोलावून ती रद्द करण्यात आली. रूग्णांचे जीव जात असताना आरोग्यमंत्री याबाबत गंभीर नाहीत. येत्या काही दिवसांत हे प्रश्न निकाली न लागल्यास १ मे २०२५ पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटनेकडून आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.
महाराष्ट्र दिनापासून हे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. रूग्णांचे जीव जात असताना आरोग्यमंत्र्याच्या खात्यात प्रकाश पडत नाही आहे. बैठका लावून त्या रद्द केल्या जात आहेत. बैठकांपेक्षा कायमस्वरूपी डॉक्टर व रिक्तपदे मंजूर करून भरणे आवश्यक आहे. येत्या सात दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास 1 मे पासून आमरण उपोषणाला बसण्यावर आम्ही ठाम आहोत.आणि जोपर्यंत फिजिशियन व डॉक्टर्स सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सेवेत रुजू होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील व यापुढे जे काही होईल याला आरोग्यमंत्री व आरोग्य प्रशासन जबाबदार राहतील असा इशारा श्री. सुर्याजी यांनी दिला आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.