
सावंतवाडी : कोकण पत्रकार संस्थेच्या प्रतिष्ठित 'पत्रकार भूषण' पुरस्काराने नुकतेच सन्मानित झालेले ज्येष्ठ पत्रकार आणि गिरणी कामगारांचे वारस अभिमन्यू गणपत लोंढे यांचा राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर आणि उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांच्या हस्ते श्री. लोंढे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष सुनील बोरकर, गंगाराम गावडे, शामसुंदर कुंभार, तसेच अभिमन्यू लोंढे यांच्या भगिनी रेखा लोंढे देसाई, विश्वनाथ कुबल, लाॅरेन्स डिसोझा, रामचंद्र कोठावळे, महादेव सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री. शिर्सेकर आणि श्री. चव्हाण यांनी श्री. लोंढे यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ आणि महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव केला. गिरणी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यात श्री. लोंढे यांनी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली, असे त्यांनी सांगितले. 'पत्रकार भूषण' पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अभिमन्यू लोंढे यांनी सत्काराबद्दल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे आभार मानले. गिरणी कामगारांशी आपले असलेले भावनिक नाते त्यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी जपत यापुढेही आपले कार्य सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सत्कार समारंभाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनीही श्री. लोंढे यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.