योगी सरकारचा मोठा निर्णय | अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला !

इतिहासाच्या पुस्तकासोबतच इतर विषयांमध्येही बदल
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 03, 2023 12:14 PM
views 359  views

ब्युरो न्युज : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्ड आणि CBSE बोर्ड यांचा अभ्यासक्रम योगी आदित्यनाथ सरकारने बदलला आहे. त्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. तसंच ११ वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती असे धडे हटवण्यात आले आहेत. २०२३-२४ या वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे.


इतिहासाच्या पुस्तकासोबतच इतर विषयांमध्येही बदल करण्यात आला आहे. याआधी बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारतीय इतिहासमध्ये शासक ते मुघल दरबार हे धडे होते. ही सगळी प्रकरणं आता वगळण्यात आली आहे.तर दुसरीकडे नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचं वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे हटवण्यात आले आहेत. या निर्णयानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी सांगितलं की “आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता ते शिकवलं पाहिजे. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते हा विषय शिकवलाच गेला नाही. त्यामुळे आम्ही मुघलांचा इतिहास वगळून त्याऐवजी हा विषय शिकवणार आहोत.”


उत्तर प्रदेश सरकारने अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांतून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्याबाबत समाजवादी पार्टीचे आमदार आणि माजी माध्यमिक शिक्षण मंत्री नवाब इकबाल मेहमुद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भाजपाचं सरकार मुस्लीम समाजाच्या विरोधात जे काही करता येईल ते सगळं करतं आहे. मात्र नुसतं इतिहासातून अभ्यासक्रम वगळून काय होणार? मुघल काळात भारताने खूप प्रगती केली होती हे कसं विसरता येईल? ” असं रोखठोक मत त्यांनी मांडलं आहे.


तसंच नवाब इकबाल मेहमुद म्हणाले की, “आता या सरकारने जी अभ्यासक्रमात सध्याची पुस्तकं आहे ती सगळी पुस्तकंही जप्त केली पाहिजेत. असं केलं तर मुघल शासकांचा इतिहास होता याचा पुरावाच नष्ट होईल. भाजपाकडून फक्त मतांच्या राजकारणासाठी या गोष्टी केल्या जात आहे. ताजमहाल, लाल किल्ला, कुतुबमिनार यांचा इतिहास फक्त भारतासाठीच मर्यादित नाही तर तो इतिहास सगळ्या जगाला माहित आहे. कारण सगळ्या जगातले पर्यटक ही ठिकाणं पाहण्यासाठी येत असतात. “


याआधी योगी सरकारने आग्रा मुघल म्युझियमचं नाव बदललं होतं. योगी आदित्यनाथ सरकारने हे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम असं ठेवलं होतं. गुलामीची मानसिकता दाखवणारी प्रतीकं उत्तर प्रदेशात नकोत या आशयाचं ट्वीटही तेव्हा योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं.