
बेंगळूर : देशभरात 'ईव्हीएम' मशीनबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सर्वसाधारण मतदारांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत, देशातील दिग्गज विरोधक, काँग्रेसला देखील 'ईव्हीएम' मशीन, मतचोरी, मतदार याद्यांच्या अद्यावतीकरासह निवडणूक आयोगाच्या एका बाजुला झुकलेल्या कारभारावर शंका आहे.
या मुळे 'ईव्हीएम'ऐवजी मतदानासाठी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्रातही विरोधकांनी याबाबत मागणी लावून धरली होती. त्याचवेळी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या कर्नाटक राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी मतपत्रिकांचा वापर करण्याचा निर्णय तिथल्या सरकारने घेतला आहे.
कर्नाटक राज्यातील आगामी बृहन बंगळूर प्राधिकरण (जीबीए) तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुका मतपत्रिकेवरच घेण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेश यांनी दिली. बृहन बंगळूर प्राधिकरणाची प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
आम्ही आतापर्यंत फक्त विधानसभा निवडणुकांसाठी 'ईव्हीएम'चा (EVM) वापर केला आहे. आगामी ‘जीबीए’ निवडणूक तसेच जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकाही मतपत्रिकेवरच होतील. जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुका मे किंवा जून महिन्यात घेण्याचा आमचा विचार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेश यांनी सांगितले.














