बाहुबली टस्करची सोनावल गावातून पुढे कूच

Edited by: लवू परब
Published on: February 11, 2026 20:13 PM
views 29  views

दोडामार्ग :  बाहुबली टस्कर सोनावल गावातून पुढे कूच करत आहे. सध्या तो पाळये गावात पोहोचला असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

गणेश टस्कर, ओंकार यांसह एकूण सहा हत्तींचा कळप घोटगे गावातच धुमशान घालत आहे. या हत्तींनी येथील शेती, फळबागायती उध्वस्त करत शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. हत्तींचा उच्छाद सुरू असताना चंदगड तालुक्यात वावरणारा बाहुबली टस्कर पुन्हा तिलारी खोऱ्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास दाखल झाला. येथील एका आंब्याच्या बागेत बाहुबली घुसला. त्याने तेथील माती सोंडेत धरून अंगावर उधळून घेतली. त्याचा हा प्रकार काहीक्षण असाच सुरू होता.  सोनावल गावात आलेला बाहुबली बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाळये गावात पोहोचला. त्याच्यावर वनविभागाची टीम लक्ष ठेवून होती.

मात्र या टीमला बाहुबलीने चकवा दिला. येथील जंगलमय भागात गेलेल्या बाहुबलीचे लोकेशन मिळणे वनविभागाला अवघड बनले.  सध्या काजूचा हंगाम असल्याने ग्रामस्थ व शेतकरी काजू बागेत वावरत आहेत. मात्र बाहुबलीच्या वाढत्या वापरामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.