
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली असून या घटनेनं दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी दोन भीषण स्फोट झाले आहेत. या स्फोटामध्ये तब्बल दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच ३० हून अधिक जखमी असल्याचे वृत्त आहे. स्फोटात एक डझनपेक्षा जास्त गाड्या जळून खाक झाल्या आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, मृत व्यक्तींच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या.
दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्या जवळ साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मेट्रो स्टेशनजवळ स्फोट झाला. मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक एक जवळ एका उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. कारमध्ये दोन स्फोट झाले. परिसरात असलेले एक डझनपेक्षा जास्त वाहनं जळून खाक झाले आहेत. ही घटना ६.४५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या स्फोटामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटना घडताच एनआयएची टीम घटनास्थळी दाखल झाली. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणांनी तपासकार्य सुरु केलं आहे. दिल्लीमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलेला असून मुंबईसह देशातील इतर भागांमध्येही हाय अलर्ट देण्यात आलाय.
मुंबईतही अलर्ट : दरम्यान, दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत. महत्वाच्या ठिकाणांवर मुंबई पोलिसाची करडी नजर असून खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. दिल्लीतला स्फोट इतका भीषण होता की, मृत व्यक्तींचे अवयव इतरत्र उडून पडले. या घटनेत बसदेखील जळाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. रिक्षामध्ये बसलेला एक जण उडून दूरवर पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. मुंबईतही अलर्ट देण्यात आला असून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.













