म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला मुहूर्त कधी ?

Edited by: भगवान शेलटे
Published on: December 26, 2023 12:39 PM
views 105  views

सिंधुदुर्ग : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांच्या सोडतीतील २९७० घरांसाठी (प्रथम प्राधान्य योजनेतील घरे वगळून) १३ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र, अचानक प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली. अद्याप सोडतीची नवीन तारीख जाहीर केली जात नसल्याने पात्र अर्जदारांमध्ये नाराजी आहे. सुमारे २४ हजार अर्जदारांना या सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीसाठी पंतप्रधान आवास योजना, प्रथम प्राधान्य, १५ टक्के एकात्मिक योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण अशा योजनांमधील ५३११ घरासाठी ५ सप्टेंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया राबविण्यात आली. यातील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यमधील २००० हून अधिक घरे वगळता २९७० घरांसाठी २४ हजार अर्जदार पात्र ठरले आहेत. वेळापत्रकानुसार या घरांसाठी १३ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र, प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली. सोडत पुढे ढकलतानाच लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाईल असे मंडळाकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुरु झाला तरी सोडतीची तारीख जाहीर झालेली नाही.