पणजी : तिळारी कालव्यांचे काम २२ डिसेंबरला पूर्ण झाल्यानंतरही गोव्याला अद्याप तेथून पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे पर्वरीतील जलशुद्धीकरण प्रकल्प बंदच असल्यामुळे उत्तर गोव्यात पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण झालेली आहे. तिळारीतून लवकर पाणी गोव्यात आल्यास ३० डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) सूत्रांनी दिली.
तिळारी धरण बांधून ३० वर्षांपेक्षा अधिक काळ गेल्याने महाराष्ट्र सरकारने या धरणातून महाराष्ट्र तसेच गोव्याला पाणी पुरवठा करणाऱ्या कालव्यांच्या डागडुजीचे काम हाती घेतले होते. गोवा सरकारला दिलेल्या हमीनुसार महाराष्ट्र सरकारने तिळारी कालव्याच्या डागडुजीचे काम २२ डिसेंबरलाच पूर्ण केले. त्यामुळे २३ डिसेंबरपासून गोव्याला पाणीपुरवठा होईल आणि पर्वरीतील प्रकल्प पूर्ण होऊन उत्तर गोव्यातील जनतेला पुढील दोन दिवसांत सुरळीत पाणी मिळेल, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनीही सांगितले होते. परंतु, २२ डिसेंबरला काम पूर्ण होऊनही अद्याप तिळारीतून गोव्यात पाणी आलेले नाही. त्यामुळे पर्वरीतील पाणी प्रकल्प सुरू झालेला नसल्याने उत्तर गोव्यातील जनतेसमोर पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झालेला असून, त्यावरून स्थानिकांत तीव्र नाराजी पसरली आहे.तिळारीच्या कालव्यांचे काम हाती घेतल्यानंतर जलस्रोत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) अस्नोडा, अंजुणे येथून उत्तर गोव्याला पाणीपुरवठा केला. या काळात पर्वरीतील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद राहिला. त्यामुळे नागरिकांना मर्यादित पाणी मिळाले. पण पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला नव्हता. परंतु, राज्यात सध्या नाताळची धूम सुरू आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो देशी-विदेशी लाखो पर्यटक गोव्यात आहेत. अशा परिस्थितीत तिळारीतून अजूनही पाणी न सोडल्यामुळे उत्तर गोव्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यात तिळारीतून आज किंवा उद्या पाणी गोव्यात आले तर त्यावर प्रक्रिया होण्यासाठी किमान दोन दिवसांचा वेळ जाऊन ३० डिसेंबरपर्यंत उत्तर गोव्यातील जनतेला आवश्यक तेवढ्या पाण्याच्या पुरवठा करता येणे शक्य आहे, असे पीडब्ल्यूडीच्या सूत्रांनी सांगितले.