पणजी : वागातोर येथे २८ ते ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अमली पदार्थ तस्करांवर करडी नजर ठेवण्यासाठी गोवा पोलीस तीन श्वानांची मदत घेणार आहे. याशिवाय सुमारे १,२०० पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा तसेच आपत्कालीन सेवेसाठी गोवा पोलिसांसह अग्निशामक दल, १०८ जीव्हीके इएमआरआय रुग्णवाहिका व इतर यंत्रणा सज्ज झाली आहे.
वागातोर येथे सनबर्न इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे. अमली पदार्थ तस्करांवर नजर ठेवण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथक एक, तर गुन्हा शाखा दोन श्वानांची मदत घेणार आहे. याशिवाय गोवा पोलीस चोख बंदोबस्त ठेवणार असून यावर्षी राज्याबाहेरील एकही पोलीस किंवा केंद्रीय दलाची मदत घेतली नसून पूर्ण जबाबदारी गोवा पोलिसांनी भारतीय रिझर्व बटालियन (आयआरबी) व इतर विभागांच्या पोलिसांच्या मदतीने हाती घेतली आहे. यासाठी गोवा पोलिसांनी चार भारतीय रिझर्व बटालियनच्या प्लाटूनसह इतर कर्मचारी मिळून सुमारे १,२०० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. या व्यतिरिक्त अग्निशामक दलाचे सुमारे ८० कर्मचारी, तर १०८ जीव्हीके इएमआरआय रुग्णवाहिकेचे कर्मचारी व इतर आपत्कालीन यंत्रणेचे मिळून १,५०० हून जास्त कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय वाहतूक व्यवस्थेसाठी वाहतूक पोलीस आणि गृहरक्षक तैनात केले आहेत. तसेच यात भारतीय रिझर्व बटालियनचे (आयआरबी) २ पुरुष आणि २ महिला मिळून चार प्लाटून तैनात केले आहेत. तसेच गोवा पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बाॅम्ब निकामी पथक (बीडीएस), जलद कृती दलाचे पोलीस, वाहतूक विभागाचे पोलीस तसेच विशेष विभागाचे पोलीस व इतर कर्मचारी सुरक्षा यंत्रणेसाठी तैनात करण्यात आले आहेत.मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशांनुसार, वरील कालावधीत आयोजकांना ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करण्यासाठी सरकारने ध्वनी प्रदूषण अंमलबजावणी समिती व इतर समितीद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. यात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा ध्वनी प्रदूषण अंमलबजावणी समितीत समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पोलीस निरीक्षक, मामलेदार आणि जीएसपीसीबी अभियंत्यांची केंद्रीय ध्वनी देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जीएसपीसीबीच्या अधिकाऱ्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या सर्व समित्या देखरेख करणार आहेत. उल्लंघन आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येणार आहे.उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून हणजूण पोलीस स्थानक ते लिटल वागातोर जंक्शन, स्टारको जंक्शन ते शापोरा किल्ला जंक्शन, हणजूण टिटो ते हणजूण किनारी पार्किंग परिसर आणि वागातोर सीता रेस्टॉरंट ते एजे सुपर मार्केट परिसर ‘नो पार्किंग’ घोषित केला आहे. याशिवाय २८ ते ३१ डिसेंबर पर्यंत खासगी प्रवाशी बस वगळता इतर अवजड वाहनांना हणजूण येथे जाणाऱ्या सहा मार्गांत ‘नो एन्ट्री’ आहे. याशिवाय विविध ठिकाणी ‘नो एट्री’सह एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.