
गुजरात : मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये ब्रिजचे दोन तुकडे झाले अन् अनेक वाहने नदीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळावरील व्हिडिओ पाहाता मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पूल कोसळल्याची माहिती मिळताच बचावपथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. किती वाहने खाली पडली, किती लोक नदीत पडले आहेत, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, चार वाहने नदीत पडली आहेत, त्यामध्ये ट्रक आणि कारचाही समावेश आहे.
आणंद आणि वडोदरा या दोन जिल्ह्यांना जोडणारा गंभीरा पूल बुधवारी सकाळी अचानक कोसळला. पूलावरून वाहने जात असताना ही दुर्घटना घडली, त्यामुळे अनेक वाहने नदीत कोसळली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. अनेक वाहने नदीत कोसळल्याने मोठ्या जीवितहानीची भीती आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. त्याशइवाय वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे
पद्रा-जंबूसर दरम्यानचा गंभीरा पूल कोसळला, ज्यामुळे पाच वाहने नदीत पडली. तर एक ट्रक पुलावर लटकलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच, यंत्रणेत गर्दी उडाली. आतापर्यंत या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. तर पाच जणांना वाचवण्यात आले आहे. सुरुवातीला तीन मृतदेह सापडल्यानंतर, आणखी पाच मृतदेह सापडले, ज्यामुळे मृतांची संख्या ८ झाली.
मध्य गुजरात आणि सौराष्ट्रला जोडणारा हा पूल आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. मिळालेल्या माहितीनुसार, एक ट्रक, एक बोलेरो आणि एक बाईकसह पाच वाहने नदीत पडली आहेत. या प्रकरणातील घटनेची माहिती स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित चावडा यांनीही X वर पोस्ट करून घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पूल कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन अमित चावडा यांनी प्रशासनाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन केले. या पुलाचे नाव गंभीरा ब्रिज असल्याचे कळले आहे. नदीत अडकलेल्या वाहनांजवळ एक महिला मदतीसाठी ओरडताना दिसली.
गुजरात विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते आणि अकलवचे आमदार चावडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पूल आणंद आणि वडोदरा जिल्ह्यांना जोडतो आणि या पुलाचा काही भाग वडोदरा जिल्ह्यात येत असल्याने प्रशासनाने काम हाती घेतले आहे. ते म्हणाले की, पूल तुटल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या पूल तुटल्यामुळे पाच वाहने नदीत पडली आहेत आणि एक ट्रक लटकत आहे. दोघांनाही माहिती देण्यात आली आहे.