पणजी : पर्यटन खात्याकडे नोंदणी नसताना गोव्यातील हॉटेल्स व इतर पर्यटन व्यवहारांची ऑनलाईन बुकिंग घेणाऱ्या तीन वेबसाईट्सना खात्याने नोटीस बजावली आहे. मेक माय ट्रीप, लोहोनो आणि गोवा व्हिलास फॉर रेन्ट या वेबसाईट्सचा यात समावेश आहे.
गोवा पर्यटन खात्याच्या सुधारित कायद्यानुसार, ऑनलाईन सेवा देणाऱ्या एजन्सींना राज्य पर्यटन खात्याकडे नोंदणी करावी लागेल. त्यानंतरच ऑनलाईन सेवा देणाऱ्यांना बुकिंग घेता येते. परंतु, मेक माय ट्रीप, लोहोनो आणि गोवा व्हिलास फॉर रेन्ट या वेबसाईट्स खात्याकडे नोंदणी न करताच ऑनलाईन व्यवहार करीत असल्याचे खात्याच्या ऑनलाईन ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग टीमच्या निदर्शनास आले. त्यानंतर या तीन बेवसाईट्सनी खात्याच्या विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचा दावा करीत त्यांना नोटीस बजावण्यात आली.
दरम्यान, पर्यटन क्षेत्रात बेकायदेशीर व्यवसायांना अजिबात थारा न देण्याचे ठरवून खात्याने अशा व्यवसायांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून मोहीम सुरू केली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याच्यासह शंभरपेक्षा अधिक जणांनी अशाचप्रकारे गोव्यातील बंगले भाड्याने दिल्याचे समोर आल्यानंतर खात्याने त्यांनाही नोटीस बजावली होती. अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खात्याने स्वतंत्र ऑनलाईन ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग टीम तयार केलेली आहे. ही टीम अशा प्रकारच्या व्यवहारांवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे यापुढे पर्यटन खात्याकडे नोंदणी न करता ऑनलाईन सेवा देणाऱ्या तसेच इतर व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकावर खात्याची नजर राहणार असून, त्यांचा व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे सिद्ध होताच त्यांच्यावर कारवाई होणार आहे, असे पर्यटन संचालक निखिल देसाई यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.