टुलॉन : जगातील सर्वात वृद्ध महिला फ्रेंच नन लुसिली रँडन यांचे मंगळवारी निधन झाले. त्या ११८ वर्षांच्या होत्या. त्यांनी फ्रान्सच्या टुलॉन शहरात अखेरचा श्वास घेतला.
रँडन यांचे प्रवक्ते डेव्हिड टवेला यांनी सांगितले की, मंगळवारी पहाटे २ वाजता त्यांचे निधन झाले. 'रँडनची एकच इच्छा होती की, आपल्या प्रिय भावाला भेटावं.' टुलॉनचे महापौर हबर्ट फाल्को यांनी ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी लिहिलंय, 'रात्री जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं निधन झालं. आम्हाला खूप दु:ख आणि वेदना होत आहेत.'
गेल्या वर्षी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जपानच्या केन तनाका यांचे निधन झाले. त्या ११९ वर्षांच्या होत्या. तनाकांच्या मृत्यूनंतर, ११८ वर्षीय सिस्टर लुसिली रँडन जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनली. त्यांना सिस्टर आंद्रे या नावानंही ओळखलं जात होतं. त्यांचा जन्म १९०४ मध्ये फ्रेंच शहरात अल्सेस इथं झाला. रँडन 19 वर्षांची असताना कॅथलिक बनली. आठ वर्षांनंतर ती नन बनली.