टाटा समूहाचा गडकरींना सकारात्मक प्रतिसाद

महारष्ट्रात गुंतवणूक वाढविणार
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 02, 2022 12:20 PM
views 332  views

नवी दिल्ली : टाटा-एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर, राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना, प्रामुख्याने विदर्भातील गुंतवणुकीसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यासंदर्भात टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी गडकरींना पत्र पाठवले आहे. ‘विदर्भ विकास मंडळ’ या बिगरसरकारी संस्थेच्या सदस्यांशी संपर्क साधून विदर्भामध्ये गुंतवणुकीच्या कोणत्या नव्या संधी असू शकतील, यावर चर्चा केली जाईल, असे चंद्रशेखरन यांनी १९ ऑक्टोबर रोजी गडकरींना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मंडळाने दिलेल्या माहितीच्या आधारे गडकरींनी टाटा समूहाला ७ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवले होते. विदर्भात प्रामुख्याने ‘मिहान’मध्ये विशेष आर्थिक विभाग (एसीझेड) आणि अन्य विभागांमध्येही औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण व पूरक सुविधा उपलब्ध आहेत. नागपूरमधून ६ राज्यांतील ३५० जिल्ह्यांमध्ये त्वरित पोहोचता येऊ शकते. त्यामुळे टाटा समूहातील विविध कंपन्यांसाठी उद्योग विस्ताराच्या मूबलक संधी आहेत, असे गडकरींनी पत्रात म्हटले होते. या पत्राला टाटा समूहाने बारा दिवसांनी प्रतिसाद देत, विदर्भात गुंतवणुकीच्या शक्यता आजमावल्या जातील, असे स्पष्ट केले आहे.