गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड आणि प्रुडंट मीडियाचे आयोजन
पणजी : तमनार प्रकल्पामुळे गोव्याची पुढील २० वर्षांची विजेची गरज पूर्ण होईल, असे मत स्टरलाईट पॉवरचे इन्फ्रा आणि बिझनेस विभाग सीओओ अरुण शर्मा यांनी व्यक्त केले. शुक्रवारी गोवा तमनार ट्रान्समिशन प्रोजेक्ट लिमिटेड (जीटीपीपीएल) आणि प्रुडंट मीडिया आयोजित ‘तुम भी चलो हम भी चले' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आमदार गणेश गावकर, जीटीपीपीएलचे निनाद पितळे, नृत्य दिग्दर्शिका ममता हुसेन उपस्थित होते.
शर्मा पुढे म्हणाले की, सध्या गोव्याला ६०० ते ७०० मेगावॉट वीज लागते. तमनार पूर्ण झाल्यावर गोव्याला कमीत कमी १२०० मेगावॉट वीज मिळेल. यामुळे गोव्याला पुढील १५ ते २० वर्षे विजेची टंचाई भासणार नाही. तमनार प्रकल्प गोव्याला हरित ऊर्जा देणार आहे. यामुळे कर्नाटकातील अक्षय ऊर्जेचे हब गोव्याशी जोडले जाणार आहेत. हा प्रकल्प पुढील १५ ते १८ महिन्यात पूर्ण होईल. यामुळे गोव्याला १०० टक्के हरित ऊर्जा मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे.
ते म्हणाले, आम्हाला गोव्याच्या जनतेच्या चांगल्या भविष्यासाठी काम करायचे आहे. आम्हाला तेथील स्थानिकांना सोबत घेऊनच पुढे जायचे आहे. सध्या आपला देश तेल, पेट्रोल, डिझेल यांसारख्या गोष्टी बाहेरच्या देशातून आयात करतो. यावर वर्षाला ९ लाख कोटी खर्च होतात. ऊर्जेची ही गरज देशातूनच भागवली, तर आपले पैसे वाचू शकतात. यासाठीच तमनारसारखा प्रकल्प आवश्यक आहे. हरित ऊर्जा तयार करण्यापेक्षा ती घरोघरी पोहोचवणे अवघड असते. तमनारमधून आम्ही ही जबाबदारी घेतली आहे.
तत्पूर्वी आशादीप स्कूल, संजय स्कूल आणि दिशा स्कूलच्या दिव्यांग मुलांनी विविध नृत्य प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्य दिग्दर्शिका ममता हुसेन यांनी त्यांना मार्गदर्शन केले. विशेष मुले ही अन्य सामान्य मुलांप्रमाणेच प्रतिभावान असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते देखील अद्भुत गोष्टी करू शकतात, असे मत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केले. कला अकादमी येथे झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.