ब्युरो न्युज : कर्नाटकमधील दणदणीत विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या विजयामागे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा मोठा वाटा असल्याचं बोलले जात आहे. अशातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय स्पष्ट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवकुमार भावनिक झालेले पाहायला मिळाले. यावेळी ते सोनिया गांधी याचं नाव घेत ढसाढसा रडले.
डी. के. शिवकुमार म्हणाले, “काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी खूप मेहनत घेतली. जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. हे सामूहिक नेतृत्वाचं फळ आहे. मी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांना विश्वास देतो की, आम्ही कर्नाटकच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू.”
सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या, मी हे कधीही विसरू शकत नाही की, या भाजपाच्या लोकांनी मला तुरुंगात टाकलं तेव्हा सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या. मी तुरुंगात राहणं पसंत केलं. हा गांधी कुटुंबाने, काँग्रेस पक्षाने आणि देशाने माझ्यावर टाकलेला विश्वास आहे, असं शिवकुमार यांनी सांगितलं.
मी, सिद्धरमय्या, सर्व आमदार आणि राज्यातील माझ्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. त्यांनी जबाबदारी घेऊन बुथ पातळीवर काम केलं. हे कुणा एका व्यक्तीच्या कामाचं यश नाही. मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत. मी नंतर भारत जोडो भवन येथे येऊन या सर्व गोष्टींवर बोलेन, असंही डी. के. शिवकुमार यांनी नमूद केलं.