सिंधुदुर्ग : देशात नव्याने सुरू झालेल्या विमानतळांपैकी पाच विमानतळ सध्या नुकसानीत चालत आहेत. चिंताजनकबाब म्हणजे गोव्यातील मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वाधिक नुकसानीत सुरू आहे. देशातील पाच विमानतळ जे सध्या नुकसानीत आहेत. त्यात मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सर्वाधिक जास्त नुकसान सोसत आहे. लोकसभेत नागरी उड्डाण राज्यमंत्री जन. डॉ. व्ही के सिंग यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती आहे.
सिंधुर्गातील चिपी विमानतळ सलग तिसऱ्या वर्षीही नुकसानीत सुरू आहे. तर गोव्यातील मोपा विमानतळाच्या २०२२-२३ ची नुकसानीचा आकडा देशातील पाच मोठ्या विमानतळामध्ये सर्वाधिक आहे. नव्याने सुरू झालेले विमानतळ जे नुकसानीत सुरू आहेत त्यांची माहिती लोकसभेतील एका प्रश्नाच्या उत्तरात आहे. त्यानुसार सिंधुदुर्गातील विमानतळ २०२०-२१ मध्ये २०.३७ कोटी, २०२१-२२ मध्ये २२.४९ कोटी तर २०२२-२३ मध्ये ४०.२० कोटी रुपयांच्या नुकसानीत आहे. २०१९ मध्ये हा विमानतळ सुरू झाला होता. या विमानतळासाठी सुमारे ८०० कोटी रूपये खर्च आला आहे. तर मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ १४८.३४ कोटींच्या नुकसानीत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झालेल्या या विमानतळावर जानेवारी २०२३ पासून विमानसेवा सुरू झाली होती. २,३१२ एकरमध्ये उभारलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी २,८७० कोटी रूपये खर्च आला आहे.