उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटणार | पवारांच्या निर्णयाचा अंतीम फैसला सायंकाळी होणार !

सुप्रिया सुळे यांचं मौन | जयंत पाटील यांना अश्रु अनावर | सकारात्मक निर्णय होईल : अजित पवार
Edited by: प्रतिनिधी
Published on: May 02, 2023 15:27 PM
views 137  views

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद अशा पद्धतीने एकाएकी सोडण्याचा अधिकार साहेब तुम्हालाही नाही. हवे असल्यास आम्हा सर्वांचे राजीनामे घ्या. पक्ष नव्या लोकांच्या हातात द्या. मात्र, प्रमुख पदावरून बाजूला होऊ नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी शरद पवारांच्या निवृत्तीला विरोध केला आहे. कार्यकर्ते हा निर्णय मागे घेण्यासाठी आक्रमक झालेत. आज सायंकाळी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय सकारात्मक होईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत आहोत, अशी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. तसेच, यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी ही घोषणा केली. त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भरकार्यक्रमातच तीव्र विरोध केला आहे. शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत सभागृह सोडणार नाही. असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे


यावेळी आपली भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना अश्रू अनावर झाले. अक्षरश: रडत रडत जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांनी वाटल्यास आम्हा सर्व नेत्यांचे राजीनामे घ्यावे. पक्ष नव्या लोकांच्या हातात द्यावा. मात्र, त्यांनी प्रमुख पदावरून बाजुला होण हे राष्ट्राच्या, राज्याच्या हिताचे नाही. आम्हाला शरद पवारांच्या छायेखालीच काम करण्याची सवय आहे.


जयंत पाटील म्हणाले, आम्ही सगळे शरद पवारांच्या नावानेच मत मागतो. त्यांच्या नावावरच आम्हाला मते मिळतात. शरद पवारच पक्षातून बाजुला झाले तर आम्ही कोणाचे नाव घेऊन लोकांसमोर जायचे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील राजकारणासाठी, वेगवेगळ्या राज्यातील लोकांसाठी शरद पवारांनी राजकारणात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांच्या नावानेच ओळखला जातो. त्यामुळे असा परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवारांनाही नाही. त्यांनी असा तडकाफडकी निर्णय घेणे आम्हाला मान्य होणार नाही. शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थिती आपला निर्णय मागे घेतला पाहीजे .