चेन्नई : राज्यासह देशभरात सध्या ऑनलाईन रमीच्या जाहिरातींचा भडिमार सुरु आहे. सोशल मीडियावर तर विविध कलाकारांकडूनच या जाहिराती केल्या जात आहेत. यावर टीकाही होत आहे. पण आता या ऑनलाईन रमीबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. पत्त्यांच्या या ऑनलाईन खेळापोटी तामिळनाडूमध्ये ४२ जणांनी आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे.
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये याबाबत थानथाई पेरियार द्रविडर काझगम (TPDK) या सामाजिक आणि राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांच्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. तामिळनाडूत ऑनलाईन गेम्स आणि ऑनलाईन जुगारावर प्रतिबंधक विधेयक राज्यपालांनी परत पाठवल्यानं हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, ऑनलाईन रमी या जुगाराच्या नादी लागल्यानं राज्यात ४२ जणांनी आत्महत्या केल्याचा दावा या संघटनेनं केला असून याला राज्यपालच जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच या प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी आत्महत्या केलेल्या चार जणांच्या अस्थी आम्ही गोळा केल्या असून त्या पोस्टाद्वारे राजभवनावर पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती टीपीडीकेचे प्रमुख अनूर जगदीशन यांनी सांगितलं.
महाराष्ट्रातही या ऑनलाईन रमीच्या जाहिरातींनी ऊत आणला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले महिला आणि पुरुष कलाकार या जुगाराच्या खेळाच्या जाहिरातील करत आहेत. या जाहिरातींमधून ते लोकांना जुगार खेळण्यास प्रोत्साहित करत असल्याचा आरोपही अनेकदा करण्यात आला आहे. त्यामुळं या कलाकारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.