कोलकात्यात सावित्री उत्सव साजरा

Edited by:
Published on: January 05, 2025 20:31 PM
views 115  views

ब्युरो न्यूज : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक ४ जानेवारी रोजी संध्याकाळी कोलकात्यात सावित्री उत्सव साजरा केला गेला. नुकतेच महाराष्ट्रातून कोलकाता मध्ये शिफ्ट झालेल्या निशा फडतरे व सचिन थिटे यांनी कोलकाता मधील उल्टाडांगा परिसरातील महाराष्ट्रीय कुटुंबांना एकत्र बोलावून सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे स्मरण करण्याच्या हेतूने हा उत्सव आयोजित केला होता. यामध्ये सावित्री जोती यांनी केलेले कार्य रंगीबेरंगी पताकांवर लिहून सावित्रीबाई, जोतिबा, फातिमा व जिजाऊ यांच्या प्रतिमासह भिंतीवर चिकटविण्यात आले. महिलांनी सावित्रीबाईंचे प्रतिक म्हणून कपाळावर आडवी चिरी लावली. दाराबाहेर सावित्रीबाईंची प्रतिमा रांगोळीतून रेखाटली गेली. शेजारी दिवा लावला गेला. लहान मुला-मुलींनी सुद्धा साऊ जोतिबाचा पेहराव केला. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तिका सर्व उपस्थितांना वाटण्यात आल्या. त्यानंतर सावित्रीबाई व जोतीबा फुले यांच्या कार्याबद्दलची सविस्तर माहिती सर्व उपस्थितांना  देण्यात आली. उपस्थितांनी आपापली मनोगते व्यक्त करून सावित्रीबाई व जोतीबा यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले. सावित्रीची गाणी, ओवी गायल्या गेल्या व त्यानंतर रात्री सर्वांचे स्नेहभोजन झाले. साधारण तीस जण सहकुटुंब यात सहभागी झाले होते.

निशा सचिन यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले. साऊ-जोती यांनी समाजासाठी केलेल्या महान कार्याचा वारसा जपणे, त्याची आठवण ठेवणे व हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे निशा फडतरे यांनी सांगितले.