अयोध्या : गेल्या तीन दशकांपासून देशातील राजकारण आणि समाजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या अयोध्येतील राममंदिराचे येत्या २२ जानेवारीला उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केली जाईल. हा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या देशभरात सर्वत्र 'रामनामा'चा जप सुरु असून सर्वांना अयोध्येतील सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली आहे. तत्पूर्वी राम मंदिरातील गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती बसवण्यात आली आहे. काळ्या पाषाणातील या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, त्यावेळी रामाच्या मूर्तीचे डोळे झाकण्यात आले नव्हते. कारागिरांनी ही मूर्ती राममंदिरात बसवल्यानंतर आणि काही धार्मिक विधी पार पडल्यानंतर आता रामलल्लाच्या डोळ्यांवरची पट्टी दूर करण्यात आली आहे.
त्यामुळे पहिल्यांदाच रामलल्लाचा चेहरा समोर आला आहे. पाच वर्षांच्या मुलाच्या रुपातील रामलल्लाची लोभस मूर्ती पाहताक्षणीच अनेकांच्या नजरेत भरत आहे. रामलल्लाच्या चेहऱ्यावरील शांत भाव आणि हास्य मूर्तीच्या सौदर्यांत आणखीनच भर टाकत आहेत. रामलल्लाचे हे पहिलेवहिले फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मैसूरच्या अरुण योगीराज यांनी काळ्या पाषाणातील रामल्ल्लाची ही मूर्ती कोरली आहे. ही मूर्ती सात फुटी असून तिचे वजन १५० किलो इतके आहे.