नवी दिल्ली : ‘मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा मिळालेला नाही. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची त्यांची मागणी गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा राहुल गांधी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, राहुल गांधी यांना अवमानना प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नसल्याने वर्ष २०२४ मध्ये त्यांच्या लोकसभा निवडणूक लढविण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी आडनाव’ टिप्पणीविरोधातील मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगितीस नकार देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने २ मे रोजी गांधींच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केली आणि आदेश राखून ठेवला होता. राहुल गांधींच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान असा युक्तिवाद केला होता की, जामीनपात्र, अदखलपात्र गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा म्हणजे त्याची लोकसभेची खासदारकी कायमची जाऊ शकते.”
‘मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणार्या राहुल गांधींच्या अर्जावर आज गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत प्रचारक यांनी निकाल दिला