मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्यासाठी लागणारे सर्व गुण आहेत. ते नक्कीच पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतात, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी राहुल गांधी हे पंतप्रधान बनण्यासाठी योग्य चेहरा असल्याचं म्हटलं होतं, यावर संजय राऊत यांनी दुजोरा दिला आहे. राऊत म्हणाले की, राहुल गांधींचा संघर्ष सुरू आहे. लोकांना संघर्ष करणारा नेता प्रचंड आवडतो. तसंच, राहुल गांधी खोट बोलत नाहीत, ते अतिशय प्रामाणिक आहेत. सोबतच ते देशभक्त आहेत आणि त्यामुळे पंतप्रधान होण्यासाठी जे गुण लागतात, ते सर्व गुण राहुल गांधींमध्ये असल्याने, ते पंतप्रधान पदाचा चेहरा असल्याचं राऊतांनी म्हटलं.काल, गुरुवारी रात्री अदानी समुहाचे मालक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र चर्चांना उधाण आलं आहे. यावर राऊत म्हणाले की, अदानी आणि पवार यांचे जुने संबंध आहेत. त्यांनी काही आजच भेट घेतलेली नाही. यापूर्वीही ते अनेकदा भेटले होते. तसंच, त्यांच्या भेटीवर मविआचं भविष्य ठरत नाही, असं राऊत म्हणाले. आम्ही राम मंदिराचे निमंत्रण मिळण्याची वाट पाहत बसलो नाही. हा 15 ऑगस्टची परेड किंवा 26 जानेवरीचा प्रजासत्ताक दिन सोहळा नाही. हा भाजपाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक जाणार नाहीत. हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही लक्ष घातलं असतं. प्रभू श्री राम सगळ्यांचे आहेत. अशा प्रकारचे राजकारण करून प्रभू श्री राम यांना त्रास होईल आणि त्यांच्या आत्म्याला त्रास होऊन परत ते वनवासात जातील, असं कृत्य करू नका, असंही संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं आहे.