पाच वेळा मुख्यमंत्री पद भूषविणारा पंजाबचा बडा नेता हरपला, प्रकाश सिंह बादल यांचं निधन

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: April 25, 2023 22:32 PM
views 133  views

चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन झालं आहे. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्यावर मोहालीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पंजाबमध्ये शोककळा पसरली आहे. प्रकाश सिंह बादल हे अकाली दलाचे वरिष्ठ नेते होते. तसेच ते तब्बल पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर बादल हे त्यांचे पुत्र आहेत. प्रकाश सिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 ला पंजाबमधील एका छोट्याशा गावात जाट शीख परिवारात झाला होता. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण पंजाबमध्ये शोक व्यक्त केला जातोय.


प्रकाश सिंह बादल यांना श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. त्यांच्यावर गेल्या आठवड्याभरापासून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत होते. डॉक्टरांची पूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी काम करत होती. पण सोमवारी त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलेली. त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टरांचं कडक लक्ष होतं. पण त्यानंतर आज त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलीय.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या आठवड्यात प्रकाश सिंह बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच त्यांनी बादल यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. प्रकाश सिंह बादल यांची गेल्यावर्षी जून महिन्यातही प्रकृती बिघडली होती. त्यांना तेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.


*राजनाथ शिंह यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण*

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना प्रकाश सिंह बादल यांच्या निधन झाल्याचं वृत्त समजल्यानंतर त्यांनी ट्विटवर बादल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “प्रकाश सिंह बादल हे एक राजकारणातील दिग्गज नेते होते. त्यांनी अनेक दशकांपर्यंत पंजाबच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शेतकरी आणि समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय”, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली व्यक्त केली. बादल यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण पंजाबमधून शोक व्यक्त केला जातोय.