उद्याच्या प्रवासाचं नियोजन आजच करा | मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 18, 2023 19:41 PM
views 194  views

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या दिवशी म्हणजे 19 जानेवारीला मेट्रो वनची सेवा दोन तासांसाठी बंद राहणार आहे. त्या दिवशी संध्याकाळी 5.45 ते 7.30 वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद राहणार आहे. मुंबई मेट्रोच्या मेट्रो टू ए आणि मेट्रो सेव्हन या मार्गाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यावेळी पंतप्रधान मेट्रोतून प्रवासही करण्याची शक्यता आहे. त्यामुळं सुरक्षिततेची खबरदारी म्हणून मेट्रो वनची सेवा 19 जानेवारीला संध्याकाळी पावणेदोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. 


अंधेरी पूर्व परिसरात अनेक कार्यालयं आहेत. संध्याकाळी ज्या वेळेत मेट्रो सेवा बंद असणार आहे, त्याच वेळेत अनेक कार्यालय सुटतात. त्यामुळे अनेक लोक घरी परतण्यासाठी किंवा लोकलच स्टेशन गाठण्यासाठी मेट्रोवर अवलंबून आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद ठेवण्यात येणार असल्यानं घरी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. तुम्हीही याच ठिकाणाहून दररोज मेट्रोनं प्रवास करणार असाल, तर उद्याच्या प्रवासाचं नियोजन आजच करा. 


काही ऑपरेशनल आणि प्रशासकीय कारणास्तव मेट्रो बंद करण्यात येणार असल्याचं मुंबई मेट्रो प्रशासनाच्या वतीनं सांगितलं आहे. त्यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यावेळी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही मेट्रोकडून करण्यात आलं आहे. 


बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील उद्याच्या नियोजित सार्वजनिक कार्यक्रमामुळे सायंकाळी 4.15 ते 5.30 या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मुंबई टाऊनकडे जाणाऱ्या तसेच 5.30 ते 6.45 या वेळेत दहिसरकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू असेल. नागरिकांनी कृपया याची नोंद घ्यावी असं मुंबई वाहतूक पोलीसांनी ट्वीट करून सांगितलं आहे. 



19 जानेवारी म्हणजेच, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान अंधेरी पूर्वमधील गुंदवली मेट्रो स्थानकाचं उद्धाटन करणार आहेत. 2015 मध्ये याच मार्गिकांच्या कामाची पायाभरही पंतप्रधानांच्याच हस्ते करण्यात आली होती. मोदींच्या स्वागताची आणि मेट्रो टू ए आणि मट्रो सेव्हन या मार्गांच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मेट्रो स्टेशन परिसरातील भिंती सजवल्या आहेत. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव अनेक उपयायोजना करण्यात आल्या आहेत. याच कारणास्तव मेट्रो वनची सेवाही संध्याकाळी पावणेदोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.  


उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच मोदी मुंबईत येणार आहेत. नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तसेच, मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणीही मोदींच्या हस्ते होणार आहे.