LIVE UPDATES

Philippines Air Force Plane Crash : फिलिपिन्समध्ये हवाई दलाच्या दोन प्रशिक्षण विमानांची हवेत धडक

चार वैमानिकांचा मृत्यू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 06:59 PM
views 32  views

फिलीपीन्स : फिलिपिन्समध्ये फिलिपिन एअर फोर्सची दोन विमाने हवेत एकमेकांवर आदळल्याने अपघात झाला आहे. यामध्ये विमानात असलेले चारही वैमानिक ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन प्रशिक्षण विमाने लिपा शहरातील 'फर्नांडो एअर बेस'वर कोसळली.

फिलिपिन एअर फोर्सने या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. एअर फोर्सने सांगितले की, अपघात घडल्यानंतर लगेचच बचाव पथके घटनास्थळी पोहोचली होती. या अपघातानंतर, सर्व 'एसएफ-260' प्रकारच्या विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. सखोल तपास पूर्ण झाल्यानंतरच त्यांना पुन्हा उड्डाणाची परवानगी दिली जाईल.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा अपघात प्रशिक्षण सराव सुरू असताना घडला. दोन्ही विमाने तळाच्या परिसरातच कोसळली आणि तळाबाहेर कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. एअर फोर्सने स्पष्ट केले की, जमिनीवर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातात प्राण गमावलेल्या वैमानिकांच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

'एसएफ-260' विमानांचे उड्डाण थांबविण्याचा निर्णय या अपघातांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. विमानांमध्ये काही तांत्रिक दोष होते का, किंवा ती आता प्रशिक्षणासाठी योग्य नाहीत का, याचा तपास केला जाईल. जर अशा प्रकारचे अपघात पुन्हा घडले, तर त्याचा परिणाम हवाई दलातील जवानांच्या मनोधैर्यावर होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, फिलिपिन एअर फोर्सला आपल्या प्रशिक्षणासाठीचे बजेट वाढवण्याची आणि नवीन विमाने खरेदी करण्याची गरज आहे. फिलिपिन एअर फोर्सने सांगितले आहे की, सध्या ते आधुनिकीकरणाच्या दिशेने काम करत आहेत.