
मडगाव : गोव्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह सर्वसामान्य रुग्णांना फिजिओथेरपी आणि पुनर्वसन सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पारुल युनिव्हर्सिटी, गोवा आणि गोवा सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाने पुढाकार घेतला असून या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.
या उपक्रमामुळे सरकारी आरोग्य संस्थांमधील फिजिओथेरपी सेवांचा विस्तार होणार असून रुग्णांना अधिक सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी चिफ मेडिकल ऑफिसर संदेश मडकईकर, डीएचएसच्या सालिना नायक, केदार रायकर, राजनंदा देसाई, पारुल युनिव्हर्सिटी, गोवा येथील कॅम्पस डायरेक्टर अजय यादव यांसह पारूल युनिव्हर्सिटीचे मान्यवर सदस्य, प्राध्यापक, नर्सिंग, फिजिओथेरपीचे विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, बाळ्ळी आणि सामुदायिक आरोग्य केंद्र, काणकोण येथे फिजिओथेरपी सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पारुल युनिव्हर्सिटीच्या नर्सिंग, फिजिओथेरपी तसेच अप्लाइड अँड हेल्थ सायन्सेस विभागांतील ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आरोग्यसेवेचा अनुभव मिळण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक जबाबदारी आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ होणार आहे असा विश्वास मान्यवरांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








