कणकवली : कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २३ वा संगीत महोत्सव येत्या १७, १८ व १९ नोव्हेंबरला होणार आहे. या महोत्सवात यंदाही दिग्गज संगीत साधकांना ऐकण्याची संधी संगीत रसिकांना लाभणार आहे. पद्मश्री पंडिता शुभा मुदगल यांचे शास्त्रीय गायन आणि मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. तर डॉ. अनिश प्रधान यांचे एकल तबला वादन सादर होणार आहे. प्रतिष्ठानच्या वामन दाजी शास्त्रीय गायन महोत्सवाचा शुभारंभ गुरूवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते होईल. यावेळी कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधुत तावडे व पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राचे गुरु पं. डॉ. समीर दुबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरम्यान वामन दाजी शास्त्रीय गायन स्पर्धेच्या पारितोषिकात यंदा वाढ करुन ती १०,०००/ रुपये, ७०००/ रुपये व ५०००/ रुपये अशी करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठाण संस्थेने केले आहे.
या संगीत महोत्सवात १८ व १९ नोव्हेंबर रोजी शास्त्रीय संगीत रसग्रहण कार्यशाळा संपन्न होणार असून प्रथम सत्रात सकाळी १० ते १ मध्ये ‘गाणाऱ्या आवाजाची तयारी’ याबाबत प. डॉ. समीर दुबळे मार्गदर्शन करणार आहेत. तर द्वितीय सत्रात सायंकाळी ४ ते ७ यात पंडिता शुभा मुदगल या ‘पुरव अंग ठुमरी गायकी’ याबाबत तर १९ नोव्हेंबर रोजी ९.३० ते १२.३० या तृतीय सत्रात ‘ठुमरी मे बोल बनाने के तरीके’ याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. १९ नोव्हेंबर सायंकाळी सहा वाजता पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्याचे गायन व पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राची विद्यार्थिनी पल्लवी पिळणकर यांचे शास्त्रीय गायन सादर होणार आहे. त्यानंतर डॉ. अनिश प्रधान यांचे एकल तबला वादन सादर होणार आहे.
महोत्सचाचा समारोप पद्मश्री पंडिता शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. या शिक्षण महोत्सवात संवादिनी साथ पं. सुधीर नायक करणार आहेत. तीन दिवस कणकवली नगरीला अनोख्या संगीत आस्वादाचा अनुभव देणाऱ्या या संगीत महोत्सवामध्ये रसिकांनी तसेच संगीत प्रेमी बांधवांनी परिवारासह सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲड. एन. आर. देसाई व कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.