भाजपने सीमावाद पुन्हा उकरून काढला !

केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा आरोप
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 27, 2022 16:59 PM
views 230  views

बेळगाव : केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही भाजपचेच सरकार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमी-अधिक प्रमाणात राजकीय फायदा होईल, या आशेने भाजपने हा मुद्दा उकरून काढल्याचा आरोप करत  सीमाप्रश्नी आज महाराष्ट्र विधानसभेने केलेल्या ठरावाला आमचा विरोध आहे, त्याचा आम्ही पक्षातर्फे आणि राज्यातील जनतेतर्फे निषेध करतो, असे केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. कर्नाटकातील प्रत्येकाने एकजुटीने कर्नाटकचे रक्षण केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बेळगावात सुवर्णसौधमध्ये आज मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले, महाराष्ट्र राज्य विधानसभेने कर्नाटकातील काही गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्याचा ठराव मंजूर केला आहे.  त्याचा कर्नाटक आणि काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध आहे. अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केले आहे. आम्ही आमच्या राज्यातील एकही गाव सोडणार नाही, त्यांचीही गावे आम्हाला नको आहेत. सभागृहातही हा प्रस्ताव ठेवणार आहोत. याबाबत ठराव मंजूर करू. कर्नाटकाच्या रक्षणासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचे आणि पक्षाचे नेहमीच सहकार्य राहील.

ते म्हणाले, राज्यांच्या सीमा निश्चित झाल्या आहेत. लोक सुखाने रहात आहेत. त्यामुळे वाद करणे चुकीचे आहे. हा वाद उकरून काढण्याचे काम भाजपनेच केल्याचा आरोप करून शिवकुमार म्हणाले, केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही भाजपचेच सरकार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमी-अधिक प्रमाणात राजकीय फायदा होईल, या आशेने भाजपने हा मुद्दा उकरून काढल्याचा आरोप त्यांनी केला. या भागाच्या राजकारणात थोडा फरक आहे, त्यामुळे त्यांनी याला फूस दिली आहे. पण कन्नड समर्थक संघटना आणि राज्यातील जनतेला घाबरण्याची गरज नाही असे शिवकुमार म्हणाले.