मुंबई : संभाजी राजांच्या स्मारकासाठी मी पाठपुरावा केला आहे. मी महापुरुषांबद्दल, स्त्रियांबद्दल कधीही चुकीचे बोललो नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असे म्हणत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य राज्यपाल, मंत्री, सत्ताधारी आमदारांनी केले आहे. त्या भाजप आमदारांवर कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित करत माझ्या विरोधात आंदोलन करण्यास भाजपने प्रोत्साहित केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणण्याची आवश्यकता नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केले होते. त्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र गेले काही दिवस या वादावर शांत असलेल्या अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर येत आपण छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाबाबत आजही ठाम असल्याचे सांगितले.
अजित पवार म्हणाले की, भाजपने मला विरोधी पक्ष नेते पद दिलेले नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. भाजपने माझ्याविरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले आहे. महापुरुषाबद्दल बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षांनी केली आहे. त्यांच्यावर कारावाई होत नाही. ते माफी मागायला तयार नाही, दिलगिरी व्यक्त करत नाहीत. मी वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.
छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाबाबत स्पष्टिकरण देतान अजित पवार म्हणाले की, द्वेशाचे राजकारण करणे मला मान्य नाही. छत्रपती संभाजी महाराजांबाबत मी सभागृहात केलेल्या विधानावर मी ठाम आहे. छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणे अधिक संयुक्तिक आहे. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे संरक्षण केले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणणे त्यांना न्याय देणार आहे. मी छत्रपती संभाजी महाराजांबाबत काही चुकीचे बोललो, असे मला वाटत नाही. मी माझी भूमिका मांडली, ज्यांना योग्य वाटेल त्यांनी ती स्वीकारावी, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
अजित पवार पुढे म्हणाले की, स्वराज्यरक्षणामध्ये सर्व गोष्टी येतात. मी वादग्रस्त विधान केलेले नाही. वादग्रस्त विधान तर राज्यपाल, भाजपाचे नेते आणि मंत्र्यांनी केले होते. त्यांच्यावर कधी कारवाई करणार? जेव्हा मी सभागृहात बोलत होतो, तेव्हा सर्वजण शांत होते. त्यानंतर जे घडले ते घडवणारा मास्टरमाईंड तिथे नव्हता. माझ्याविरोधात आंदोलन करण्याचे आदेश दिले गेले, असा दावाही अजित पवार यांनी केला. तसेच मी काही इतिहास संशोधक नाही. मी जे काही वाचले त्यावरून माझे जे मत बनले ते मी मांडले, असेही अजित पवार म्हणाले.