पणजी : हरियाणातील भाजपा नेत्या आणि टिक टॉक स्टार सोनाली फोगाट हिच्या मृत्यूप्रकरणात गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सोनाली यांचे पीए सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या दोघांना अटकही करण्यात आली आहे. सोनाली यांच्या मृतदेहाचे गोव्यात पोस्टमार्टेम करण्यात आले. 23ऑगस्ट रोजी सोनाी यांचा मृतदेह गोव्याच्या एका हॉटेलमध्ये सापडला होता. आता या हत्येप्रकरणात सुधीर आणि सुखविंदर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती, सोनाली यांचे मेव्हणे अमन पुनिया यांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी सोनाली यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्याची सहमती सोनाली यांच्या परिवाराने दिली होती. 3डॉक्टरांच्या पॅनेलने चार तास पोस्टमार्टम केले. या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले.
सोनाली यांचा भाऊ आणि मेव्हणे यांच्या दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंह यांनी दिली आहे. पोस्टमार्टेम अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. सोनाली यांना कर्लीज रेस्टॉरंटमध्ये ड्रग्ज देण्यात आले होते का, तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रेस्टॉरंटच्या लेडीज वॉशरुममध्ये आणण्यात आले होते का, हे सगळे चौकशीचे विषय असून त्या प्रकरणी चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यापूर्वी गोव्यात अमन पुनिया यांनी आरोप केला आहे की, सोनाली यांच्या मृत्यूनंतर 12 तास सुधीर सांगवान त्यांचा मोबाईल वापरत होता. सुधीर यांच्याकडून सोनालीचा मोबाईल का घएतला नाही, असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला. मात्र पोलीस त्याचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. पुनिया यांच्यादाव्यानुसार, सुधीरच सोनाली यांना घेऊन कर्लीज रेस्टॉरंटमध्ये आला होता. तिथे सोनाली यांची प्रकृती बिघडल्यानंतर तीन तास सुधीर सोनाली यांना घेऊन लेडीज वॉशरुममध्ये बसून होता. त्याने सोनाली यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये का नेले नाही, याची चौकशी होण्याची मागणी पुनिया यांनी केली आहे. सोनाली यांच्या मृत्यूची बातमी सुधीर याने सोनाली यांच्या कुटुंबीयांना सकाळी आठ वाजता दिली.
अमन यांनी असाही आरोप केला आहे की, सोनाली यांची हत्या हे मोठे राजकीय षडयंत्र आहे. सुधीर या प्रकरणातील प्यादे असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सोनाली यांनी ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्याने त्यांची तब्येत बिघडल्याचे सुधीर याने अमन आणि रिंकू यांना सांगितले होते. सोनाली सेलिब्रिटी असल्याने, त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो नाही. असेही सुधीरने सांगितल्याची माहिती आहे. सोनाली फोगाट यांना ड्रग्जचा ओव्हरडोस जाणीवपूर्वक देण्यात आल्याचा आरोपही अमन पूनिया यांनी केला आहे.
गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची चौकशी सुरु केली आहे. सोनाली जेव्हापासून गोव्यात आली होती, तेव्हापासून ती त्याच रिसॉर्टमध्ये जेवत होती, अशी माहितीही तपासात समोर आली आहे. फक्त २२ ऑगस्टच्या रात्रीच त्यांनी वकर्लीज रेस्टॉरंटमध्ये डीनर केले. रिसॉर्टमध्ये सोनाली, सुधीर आणि सुखविंदर यांनी दोन रुम बुक केल्या होत्या. अशीही माहिती तपासात समोर आली आहे. सकाळी सातच्या सुमारास सुधीर त्याच्या रुममधून बाहेर पडला. रिसॉर्टच्या व्यवस्थापनाच्या माहितीनुसार सोनाली यांचा मृत्यू रिसॉर्टमध्ये झाला नाही. हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
सोनाली यांचा भाऊ रिंकूच्या तक्रारीत सुधीर याच्याविरोधात सोनालींवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या ३ वर्षांपासून सुधीर हे करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी सोनाली यांच्या घरात झालेल्या चोरीतही सुधीर यांचा सहभाग असल्याचे सोनाली यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सोनाली यांची प्रॉपर्टी हडपण्याचा सुधीर याचा विचार होता, असा आरोपही करण्यात आला आहे.