मुंबई : सीएनजी दरवाढीमुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांना आर्थिक फटका बसत असून सातत्याने भाडेवाढीची मागणी करुनही राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. तसे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांना दिले आहे.
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो सहा रुपये कपात केली. ही कपात कमीच असून टॅक्सी चालकांना आर्थिक फटका बसतो आहे.
१ मार्च २०२१ झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण ३२ रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी २५० ते ३०० रुपये जादा मोजावे लागत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.
सध्या टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये असून त्यात दहा रुपयांची वाढ मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही वाढ न मिळाल्यास गणेशोत्सवानंतर १५ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मार्च २०२१ ला टॅक्सीचे भाडे २२ रुपये झाले. त्यानंतर त्यात तीन रुपयांची वाढ झाली आणि भाडे २५ रुपयांपर्यंत पोहोचले. रिक्षाचे भाडेही १८ रुपयांवरुन २१ रुपये झाले होते. सध्या सीएनजीचे दर प्रति किलोग्रॅम ८० रुपये आहे.