नवी दिल्ली :
शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी दिल्लीत आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यामुळे आता 18पैकी 12 खासदार हे शिंदेंसोबत असल्याचं स्पष्ट झालंय.
खासदारांसह पंतप्रधानांची घेणार भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दौऱ्यावर आहेत. रात्री दिल्लीत 12 शिवसेना खासदारांसोबत हॉटेलमध्ये चर्चा झाली. आज 12 खासदारांसह शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. तर ओबीसी आरक्षण प्रकरणी ज्येष्ठ वकीलांसोबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची माहितीही शिंदेंनी दिलीय.
गटनेते आणि प्रतोद नेमल्याचं पत्र
शिंदे समर्थक खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतलीये. राहुल शेवाळे हे गटनेते आणि भावना गवळी या प्रतोद असल्याचं पत्र त्यांनी बिर्ला यांना दिलंय. शेवाळे, गवळींसह श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. आजच हे खासदार निवडणूक आयोगालाही पत्र देण्याची शक्यता आहे.