पणजी : पंतप्रधान मोदी आज येताहेत सिंधुदुर्गच्या हाकेच्या अंतरावर. गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या मोपा म्हणजेच आताच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद् घाटन रविवारी सायंकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी मोदी दुपारी २ वाजता पणजीत आयोजित नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोच्या समारोप समारंभाला उपस्थित राहून उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.
मोपा विमानतळाच्या उद् घाटन प्रसंगी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय विमानोड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनय तेंडुलकर, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची उपस्थिती असणार आहे.
१३ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. सुमारे २,८७० कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचा गोव्याच्या पर्यटनाला मोठा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवलेला होता. त्यानंतर सहा वर्षांनी त्यांच्याच हातून रविवारी या विमानतळाचे उद् घाटन होणार आहे.
दरम्यान, मोपा विमानतळाच्या उद् घाटनाआधी पंतप्रधान मोदी पणजीत आयोजित नवव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात ते धारगळ येथील आयुष इस्पितळासह उत्तर प्रदेशातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन आणि दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट होमिओपॅथिक या दोन प्रकल्पांचेही व्हर्च्युअल पद्धतीने उद् घाटन करणार असून, उपस्थितांनाही संबोधित करणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पणजीत येणार असल्याने शनिवारी सकाळपासूनच पणजी पोलिसांनी ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा लावण्यास सुरुवात केली होती. पर्यटन हंगाम आणि त्यातच कला अकादमी प्रांगणात जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोच्या निमित्ताने नागरिकांची गर्दी झालेली होती. त्यामुळे शनिवारी सायंकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्मार्ट सिटीअंतर्गत कामांसाठी पणजीतील अनेक ठिकाणचे रस्ते खोदलेले आहेत. त्याचाही मोठा फटका पणजीतील वाहतुकीवर होत आहे. त्यावर मात करून वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे. पंतप्रधान मोदी रविवारी दुपारी काही तास पणजीत असणार आहेत. या काळात त्यांच्या सुरक्षेत कोणतीही हयगय होऊ नये. तसेच पणजीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही सुरळीत रहावी, यासाठी प्रत्येक जंक्शनवर चार ते पाच वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जवळपास सर्वच ठिकाणचे सिग्नल बंद असल्याने वाहतूक पोलिसांवर मोठा ताण पडत आहे. शिवाय त्याचा फटका वाहन चालक आणि स्थानिकांनाही बसत आहे. यामुळे रविवारचा दिवस हा पणजीवासीयांसाठी थोडा कष्टाचा ठरण्याची शक्यता दिसून येत आहे. मात्र रविवार असल्याने गर्दीची शक्यता कमी आहे.
मोपा विमानतळाचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव केंद्रीय विमानोड्डाण मंत्रालयाने निश्चित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारीच या नावाची अधिकृत घोषणा करणार आहेत. विमानतळाच्या नावावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. यावरून तीन गट तयार झाले होते. एका गटाने पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुसऱ्या गटाने माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकरांच्या नावाची मागणी केली. तर, तिसऱ्या गटाने पहिले विरोधी पक्षनेते जॅक सिक्वेरा यांचे नाव देण्याची मागणी केली होती. नावावरून वाद वाढत असतानाच राज्य सरकारने विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव केंद्राला सादर केला होता. नावाचा वाद आणखी चिघळू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेवटपर्यंत नाव गुलदस्त्यात ठेवले होते. परंतु, केंद्राकडून ते निश्चित करण्यात आले आहे.
राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची जय्यत तयारी गेल्या चार दिवसांपासूनच सुरू केली होती. पंतप्रधानांच्या सुरक्षेची विशेष जबाबदारी असलेली एसपीजी गेल्या काही दिवसांपासून राज्यात तळ ठोकून आहे. पंतप्रधान मोदींचा ताफा ज्या रस्त्यांवरून जाणार आहे आणि ते ज्या ठिकाणांना भेटी देणार आहेत त्यांच्या तपासणीसह पोलीस बंदोबस्ताचाही एसपीजीकडून वारंवार आढावा घेतला जात आहे.