नोकरशाह, सैनिकांना सरकारच्या प्रचाराला जुंपणे लोकशाहीसाठी धोकादायक

मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांना खरमरीत पत्र
Edited by:
Published on: October 23, 2023 14:21 PM
views 215  views

केंद्रातील भाजपा सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही रथ यात्रा काढण्यात येणार आहे. या रथ यात्रेच्या माध्यमातून सरकारने केलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना जिल्हा रथ प्रभारी नेमल्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी (२२ ऑक्टोबरला) जोरदार टीका केली.

सरकारी यंत्रणेचा मोठा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून खरगे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसेच काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाने वार्षिक सुट्टीवर जाणाऱ्या सैनिकांना ‘सैनिक राजदूत’ बनून आपापल्या गावात सरकारी योजनांचा प्रचार करण्यास सांगितले होते, अशीही आठवण खरगे यांनी करून देत यावरही टीका केली.

“सैनिक आणि वरिष्ठ अधिकारी हे सरकारचे महत्त्वाचे विभाग असून त्यांना आजवर राजकारणाच्या बाहेर ठेवण्यात येते. विशेष करून लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना त्यांचा असा प्रचारासाठी वापर करणे चुकीचे आहे. आपल्या लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याकरिता नोकरशाही आणि सशस्त्र दलांना राजकारणात ओढणारे आदेश त्वरित रद्द करणे आवश्यक आहे”, असेही खरगे म्हणाले.