म्हापसा : कळंगुटमध्ये चालणारे डान्सबार, डिस्को क्लब, टाऊटस् व बेकायदा गाईड्सवर येत्या ३० डिसेंबरपर्यंत कडक कारवाई करून हे अनैतिक व्यवहार बंद केले जातील, असे आश्वासन पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी कळंगुटचे आमदार व पंचायत मंडळाला दिले.
बुधवारी सकाळी आमदार मायकल लोबो, सरपंच जोजफ सिक्वेरा, उपसरपंच गीता परब यांनी पंचायत मंडळ व रहिवाशांसमवेत पोलीस महासंचालकांची भेट घेतली व गावात सुरू असलेले अनैतिक धंदे बंद करण्याची विनंती केली. प्रामुख्याने टाऊट्स, बेकायदा गाईडस् व डान्सबारवर कारवाईची विनंती करण्यात आली.
या मागणीनुसार चालू महिन्याच्या शेवटीपर्यंत हे सर्व व्यवहार कारवाईद्वारे बंद होतील. यासाठी कळंगुट पोलिसांसह पोलीस मुख्यालयातून खास पथकाची नियुक्ती केली जाईल, अशी हमी महासंचालक सिंग यांनी दिल्याची माहिती आमदार लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
टाऊट्स व बेकायदा गाईडसवर कारवाई झाल्यास डान्सबार तसेच अनैतिक व्यवहार आपोआप बंद होतील. त्यामुळे या गोष्टीवर प्रथम कारवाई करावी. हे डान्सबार पंचायतीच्या परवान्याचा गैरवापर करत आहेत. रेस्टॉरन्टच्या नावे परवाना घेऊन आत डान्सबार थाटले गेले आहेत, असा दावा लोबो यांनी केला.
पूर्वी पंचायत व उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाने या डान्सबारवर कारवाई केली होती. बार व क्लबचे बांधकाम पाडण्यात आले होते. पण कालांतराने हे प्रकार पुन्हा सुरू झालेले आहेत. कळंगुटमध्ये चालणारे हे प्रकार बंद व्हावेत, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. त्यांनीही कारवाईची हमी दिली होती. आपण हे अनैतिक प्रकार बंद करण्यासाठी पंचायतीच्या पाठीशी आहे, असे आमदार लोबो यांनी स्पष्ट केले.
सरपंच जोजफ सिक्वेरा म्हणाले, कळंगुटमधील डान्सबार व डिस्को क्लब बंद व्हायला हवेत. पंचायतीने या आस्थापनांना रेस्टॉरन्टचा परवाना दिलेला आहे आणि हा परवाना रात्री ११ पर्यंतच आहे. त्यानंतर अबकारी खात्याकडून हे लोक परवाना घेतात आणि पहाटेपर्यंत आपले आस्थापन सुरू ठेवतात. या डान्सबारमुळे गावचे नाव बदनाम होत असून त्यामुळेच आम्ही पंचायत मंडळ व आमदार ते बंद करण्यासाठी पुढे आलो आहोत. हे बार बंद होतीलच, असा दावा त्यांनी केला.
पोलीस महासंचालकांनी आम्हाला डान्सबार व अनैतिक प्रकारांवर कारवाईचे आश्वासन दिलेले आहे. २०१२ पासून कळंगुटमध्ये हे प्रकार सुरू होऊन त्यात वाढ झालेली आहे. सरकारने हे धंदे बंद करण्यासाठी योग्य कायदा करावा. महाराष्ट्रात जर डान्सबार बंद हाेतात तर आमच्या कळंगुटमध्ये का नाही, असा प्रश्न उपसरपंच गीता परब यांनी उपस्थित केला.
सध्या कळंगुटमध्ये १६ डान्सबार असून या सर्वांना गुरूवारी १५ रोजी पंचायतीतर्फे कारणे दाखवा नोटीसा बजावल्या जातील. त्यानंतर पंचायत राज कायद्यानुसार पुढील कारवाई होईल, असे सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.