पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीच्या प्रगती मैदानात झालेल्या कार्यक्रमात 5G सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. 4G सेवेपेक्षा तब्बल १० पट वेग असणाऱ्या 5G सेवेमुळे सर्वच क्षेत्रात कामकाज वेगानं होण्यास मोठी मदत होणार आहे. १०० एमबीपीएसवरून इंटरनेटचा वेग 5G सेवेमुळे थेट १० जीबीपीएसवर जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे ‘नेट स्लो’ असल्याचं कारण आता कुणाकडूनही येणार नाही, असं मिश्किलपणे म्हटलं जात आहे. मात्र, नेमकी कुठल्या शहरांमध्ये ही सेवा कधीपासून सुरू होणार आहे? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, या मोठ्या शहरांसह संपूर्ण भारतात ही सेवा नेमकी कधीपासून उपलब्ध होणार? असाही प्रश्न नेटिझन्सला पडला आहे. यासंदर्भात खुद्द मुकेश अंबानी यांनीच उद्घाटनाच्या कार्यक्रमात माहिती दिली आहे.
१३ शहरांपासून सुरुवात!
5G सेवा येत्या दिवाळीपर्यंत एकूण १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या नागरिकांचा मोबाईल 5G सेवेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य अर्थात 5G Enabled असेल, अशा नागरिकांना ही सेवा वापरता येईल. अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यापैकी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये आधी सेवा सुरू केली जाईल.
संपूर्ण देशात कधी सुरू होणार?
दरम्यान, ही १३ शहरं वगळता संपूर्ण भारतात ही सेवा नेमकी कधीपासून सुरू होणार? याविषयी नेटिझन्स आणि नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. यासंदर्भात मुकेश अंबानींनी उद्घाटनाच्या भाषणात माहिती दिली आहे. “येत्या डिसेंबरपर्यंत जिओची 5G सेवा देशाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचेल. या सेवेचं आज प्रात्याक्षिक सादर करणं ही आमच्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. आम्ही आता या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहोत. आता इंडियन मोबाईल काँग्रेस खऱ्या अर्थानं एशियन मोबाईल काँग्रेस आणि नंतर ग्लोबल मोबाईल काँग्रेस व्हायला हवी”, असं मुकेश अंबानी म्हणाले.
“5G सेवेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. कारण या सेवेमुळे शेती, सेवा क्षेत्र, व्यापार, उद्योग, असंघटित क्षेत्र, दळण-वळण, ऊर्जा व्यवस्थापन या सर्वच क्षेत्रातील कामकाज वेगाने होण्यास मदत होणार आहे. यामुळे सर्वच प्रकारचे आर्थिक व्यवहार अधिक वेगाने होतील”, असंही मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.