पुणे : पुणेकरांना आता रिक्षाने प्रवास करताना आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण पुण्यातील रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. पुणेकरांना आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी 4 रुपये आणि त्यापुढील किलोमीटरसाठी 3 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. रिक्षा भाडेवाढीस मंजुरी देण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
रिक्षा भाडेवाढीचा निर्णय 1 सप्टेंबर पासून लागू होणार आहे. सीएनजीचे दर वाढल्याने भाडेवाढ करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना गणेशोत्सवात खिशा आणखी खाली करावा लागणार आहे.
नागरिकांना रिक्षात बसल्यानंतर आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी २५ रुपये तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रूपये मोजावे लागणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेल नंतर सीएनजीच्या दरात देखील वाढत होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी धरली होती. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अखेर भाडेवाढीचा निर्णय घेतला.
पुण्यात जवळपास 90 हजाराहून अधिक रिक्षा धावतात. प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजीवर भर दिला जात आहे. तसेच रिक्षाचालकांना देखील सीएनजीवर रिक्षा चालवणं पेट्रोलपेक्षा परवडतं. रिक्षा चालकांना 91 रुपये प्रति किलो दराने सीएनजी मिळतो.