नवी दिल्लीत होणाऱ्या बहुभाषिक साहित्य महोत्सवात प्रा. डॉ. नामदेव गवळी निमंत्रित

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2024 06:25 AM
views 253  views

सावंतवाडी : नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महोत्सवात मालवणी बोलीतील काव्य वाचनासाठी कारीवडे येथील कवी, प्रा डॉ नामदेव गवळी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने ११ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या या  साहित्य महोत्सवासाठी देशभरातून १०० पेक्षा जास्त भारतीय प्रादेशिक भाषामधील साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहेत.

ग्रामीण साहित्य हे अस्सल भूमीचे व जन्मजात असे साहित्य असुन सर्व साहित्याचे ते मुख्य अंग आहे. जागतिकीकरणामुळे अनेक ग्रामीणत्व परंपरा नष्ट होत आहेत.या ग्रामीण साहित्याला ऊर्जितावस्था व प्रोत्साहन मिळण्यासाठी साहित्य अकादमीने या साहित्य महोत्सवासाठी आयोजन केले आहे. या राष्ट्रीय साहित्य पुरस्कार वितरणात प्रख्यात उर्दू लेखक गुलजार यांच्या व्याख्यानासह भारतीय बहुभाषिक साहित्यिक कार्यक्रम या सहा दिवसात आयोजित करण्यात आले आहे.

        डॉ नामदेव गवळी हे वैभववाडी येथील महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेच्या आनंदबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गेली ३० वर्षे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मालवणी बोलीतील भातालय या काव्यसंग्रहाला १२ राज्य पुरस्कार व इतर सन्मान प्राप्त झाले असुन या काव्यसंग्रहातील कवितांचा मुंबई व शिवाजी विद्यापीठातील स्वायत्त महाविद्यालय विवेकानंद कॉलेज येथे पदवी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

       तसेच डॉ नामदेव गवळी यांच्या भातालय या काव्यसंग्रहावर प्रा प्रवीण बांदेकर, प्राचार्य गोविंद काजरेकर, प्रा. भाऊ गोसावी, कवी अजय कांडर, प्रा. मोहन कुंभार, डॉ. रणधीर शिंदे आदींनी लेखन केले आहे. हा काव्यसंग्रह लोक वाड:मयगृहाने प्रकाशित केला आहे. डॉ नामदेव गवळी यानी मालवणी लेखनासह मालवणी मुलखातील लोक साहित्यावर डॉ बाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी संशोधन केले आहे. 

       राष्ट्रीय साहित्य महोत्सवासाठी डॉ नामदेव गवळी यांना निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी तसेच  कारिवडेवासियानी अभिनंदन केले आहे.