पंतप्रधानपद गेले आणि आता इम्रान खान यांची खासदारकीही

निवडणूक आयोगाचा मोठा दणका
Edited by: ब्युरो
Published on: October 21, 2022 16:32 PM
views 163  views

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना मोठा झटका बसला आहे. आधीच पंतप्रधान पदावरून पाय उतार झालेल्या इम्रान खान यांची खासदारकीही रद्द झाली आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इम्रान खान यांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे.

इम्रान खान यांनी चुकीची उत्तरे दिली होती. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुल्तान रजा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांच्या बेंचने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

इम्रान खान यांनी तोशखानामधील  भेटवस्तू स्वस्तात खरेदी करून महागात विकल्या होत्या, असा आरोप पाकिस्तानच्या सत्ताधारी आघाडीच्या खासदारांनी केला होता. या संदर्भात या खासदारांनी निवडणूक आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयुक्तांनी सुनावणी घेतली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर आज आयोगाने निर्णय दिला आहे.

इम्रान खान 2018मध्ये पंतप्रधान बनले होते. यावेळी त्यांनी अरब देशांचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांना अरब देशातील शासकांनी महागडे गिफ्ट दिले होते. इम्रान खान यांनी हे गिफ्ट तोशखानामध्ये जमा केले होते. त्यानंतर इम्रान खान यांनी तोशखानामधील हे गिफ्ट स्वस्तात खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी या भेटवस्तू महागात विकल्या होत्या. या सर्व प्रक्रियेला इम्रान यांच्याच तत्कालीन सरकारने मंजुरीही दिली होती.

यावेळी इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाकडे आपली बाजू मांडली होती. राज्यातील खजिन्यातून हे गिफ्ट्स 2.15 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले होते. ते विकून 5.8 कोटी रुपये मिळाले होते. या भेटवस्तूत एक घड्याळ. महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळ होत्या, असं इम्रान यांनी सांगितलं होतं.