भोपाळ : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात आईच्या मृत्यूनंतर अवघ्या १२ तासांतच मुलाचाही अपघातात मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे. आधी आईचा बाईक अपघातात मृत्यू झाला, तर मुलाचा कार अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राणी देवी (५५) आणि त्यांचा मुलगा सूरज सिंह अशी मृतांची नावे आहेत. दोघांवर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी जटारी येथे एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
पतीच्या निधनानंतर राणी देवी यांनी तीन मुले आणि तीन मुलींचे संगोपन केले होते. राणी देवी मोठा मुलगा प्रकाश आणि धाकटा मुलगा सनीसोबत गावात राहत होत्या. तर मधला मुलगा सूरज इंदूरला राहत होता.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी राणी देवी मुलगा सनीसोबत बाईकने आपल्या माहेरच्या घरी जात होत्या. तेव्हा त्यांच्या गावापासून १२ किमी अंतरावर असलेल्या डभौरा येथे समोरून येणाऱ्या बाईकने त्यांना धडक दिली. सनी आणि त्याची आई राणी देवी यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना रेवा येथे हलविण्याचे सुचविले मात्र, रुग्णालयात नेत असतानाच राणी देवी यांचा मृत्यू झाला. मुलगा सनी याला फ्रॅक्चर झाले आहे, अशी माहिती जात्री गावच्या सरपंच संतरा देवी यांनी दिली.
मुलगा सूरज याला आईच्या मृत्यूची बातमी समजताच तो इंदूरहून मूळ गावी जाण्यासाठी निघाला. त्याचा मित्र अभिषेक याच्यासह तो गाडीतून येण्यास निघाला. दोघांनाही गाडी चालवायला येत नसल्याने ते ड्रायव्हरसह ते निघाले. सूरज सतना जिल्ह्यातील रामपूर बघेलान येथे पोहोचला असतानाच त्याच्या गावापासून सुमारे १०० किमी दूर त्याच्या कारला अपघात झाला.
रामपूर बघेलन पोलीस स्टेशनचे प्रभारी संदीप चतुर्वेदी म्हणाले की, आम्हाला सकाळी ७ वाजता या अपघाताची माहिती मिळाली. गाडीचा टायर फुटल्याचे दिसून येते. त्यामुळे कारचे नियंत्रण सुटले आणि उभ्या असलेल्या ट्रकला ही कार धडकली. तिघांनाही रीवा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सूरजचा मृत्यू झाला तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.