मोपा विमानतळावर सोने तस्करी

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 23, 2023 19:35 PM
views 448  views

पणजी : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) गोवा विभागाने मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर छापा टाकून २.२२ कोटी रुपये किमतीचे ३.५ किलो सोने जप्त केले होते. या प्रकरणी डीआरआयने अटक केलेल्या नीतेश सैनी (उत्तर प्रदेश) या प्रवाशासह मोहम्मद रफीक (राजस्थान) या दोघांचा जामीन अर्ज उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

डीआरआयने १८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सापळा रचला होता. त्यावेळी अबुधाबीहून आलेल्या उत्तर प्रदेश येथील नीतेश सैनी याच्यावर संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. त्यावेळी त्याने आणलेल्या एका मशीनची तपासणी केली असता, त्यात २.२२ कोटी रुपये किमतीचे ३.५ किलो सोने सापडले. ते जप्त करून डीआरआयने त्याला अटक केली. त्याची चौकशी केली असता, सोने नेण्यासाठी एक व्यक्ती विमानतळाच्या बाहेर थांबल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार, डीआरआयने बाहेर थांबलेल्या मोहम्मद रफीक (राजस्थान) याला अटक केली. डीआरआयने त्यांच्या विरोधात कस्टम कायद्याअंतर्गत कारवाई करून अटक केली. संशयितांना कोठडीसाठी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघांची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

दरम्यान, संशयितानी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी डीआरआयतर्फे अॅड. रवीराज चोडणकर यांनी न्यायालयात बाजू मांडून यात आंतरराष्ट्रीय तस्करांचा समावेश असून यात गुंतलेल्यांना अटक करण्याची आवश्यकता अाहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय तस्कर देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा युक्तिवाद न्यायालयात मांडला. याची दखल घेऊन न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू एेकून घेतल्यानंतर संशयिताचा जामीन अर्ज फेटाळून लावला