पर्यटकांनो गोव्यात येतायत ? डोन्ट टेक टेन्शन !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 23, 2023 14:20 PM
views 1672  views

पणजी : नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात देशविदेशांतील पर्यटकांची गर्दी होत असते. वाहनांची संख्याही प्रचंड वाढते. यामुळे पर्यटन स्थळे आणि शहरी भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘वाहतूक व्यवस्थापन आराखडा’ तयार केला आहे. त्याप्रमाणे संपूर्ण राज्यभर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ८०० पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे.

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देशी पर्यटक गोव्यालाच पसंती देत असतात. यानिमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातसह देशाच्या अन्य भागांतून मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. यामुळे पर्यटन स्थळांवर २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या असतात. तासन् तास लोक कोंडीत अडकलेले असतात. शिवाय लहान मोठ्या अपघातांचीही शक्यता आहे. याच बाबी लक्षात घेऊन वाहतूक खात्याने वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे.वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वरील कालावधीत वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी संपूर्ण राज्यात ८०० पोलीस तैनात राहतील. एरव्ही याच कामात ५०० पोलीस तैनात असतात. कळंगूट आणि बागा किनारपट्टीत पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे येथे विशेष लक्ष दिले जाणार आहे. सनबर्न महोत्सवासाठीही २६ डिसेंबरपर्यंत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला जाईल. या काळात अपघात टाळण्यासाठीही विशेष दक्षात घेण्यात आली आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ही मोहीम कालपासूनच सुरू करण्यात आली आहे. काल दिवसभरात २६ मद्यपी चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे असे कौशल्य यांनी म्हटले आहे.