LIVE UPDATES

रत्ननगरीत प्रथमच ‘वरदाम्’ संमेलन उत्साहात

व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीचा जागर; मान्यवरांच्या मार्गदर्शनातून युवतींना नवी प्रेरणा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 07:56 PM
views 30  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

देवगड : युवतींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, आत्मविश्वास आणि राष्ट्राप्रती बांधिलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरी आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत प्रथमच आयोजित करण्यात आलेले ‘वरदाम्’ युवती संमेलन उत्साहात संपन्न झाले. विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजविणाऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनासह परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हे संमेलन युवतींसाठी प्रेरणादायी ठरले.

संमेलनाची सुरुवात ‘पंचतुंड नररुंड’ या नांदीने झाली. यावेळी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पा पटवर्धन आणि राष्ट्र सेविका समितीच्या सहकार्यवाहिका श्रीमती उमाताई दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती उमाताई दांडेकर यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर विचार मांडताना कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. “कुटुंब चांगले असेल, तर समाज उत्तम घडतो,” असे सांगत सुसंस्कारित कुटुंबव्यवस्थेतूनच सुदृढ समाजाची निर्मिती होते, असे त्यांनी प्रतिपादन केले.

परिसंवादातून व्यक्तिमत्त्व विकासाचा संदेश

संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात आयोजित परिसंवादात रत्नागिरीतील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर कश्ती शेख, ‘प्राचीन कोकण’च्या संचालिका सौ. स्वरूपा सरदेसाई आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिल्हा संयोजक तथा छात्रनेत्या श्रावणी महाजन सहभागी झाल्या. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या श्रीमती कल्पना आठल्ये यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

कश्ती शेख यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव कथन करताना एका छोट्या निर्णयामुळे जीवनाला नवी दिशा कशी मिळाली, याविषयी विचार मांडले. योग्य वेळी घेतलेला छोटासा निर्णयही आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो, हा प्रेरणादायी संदेश त्यांनी उपस्थित युवतींना दिला.

सौ. स्वरूपा सरदेसाई यांनी महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढाकार घ्यावा, स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा आणि स्वावलंबनाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असे आवाहन केले. तर श्रावणी महाजन यांनी आपल्या SEIL उपक्रमातील सहभागाचा तसेच संसद भवन भेटीचा अनुभव सांगितला. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःपुरता विचार न करता देशाच्या हिताला प्राधान्य देणारी व्यापक दृष्टी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “भारताचा विद्यार्थी हा केवळ स्वतःचा नव्हे, तर संपूर्ण भारताचा विचार करणारा असला पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘स्वतंत्रते भगवती’च्या नृत्याविष्काराने समारोप

संमेलनाच्या समारोपप्रसंगी नटराज कथ्थक क्लासेसच्या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘स्वतंत्रते भगवती’सह विविध गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. या सांस्कृतिक सादरीकरणातून भारतीय संस्कृती, देशभक्ती आणि कलाविष्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत उपाध्यक्ष प्रा. शिवराज कांबळे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे आणि शहरमंत्री ज्ञानेश्वर चंदनकर उपस्थित होते.

युवतींनी आत्मविश्वासाने पुढे यावे, स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घ्यावी, सामाजिक बांधिलकी जपावी आणि राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश देत रत्नागिरीत प्रथमच आयोजित ‘वरदाम्’ युवती संमेलनाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.