
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असून, त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात गोव्यात येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्या हस्ते राज्य सरकारच्या काही नव्या योजनांचा शुभारंभ होऊ शकतो, अशी माहिती आहे. मात्र दौऱ्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. निवडणूक आता फार दूर नसल्याने भाजपने कंबर कसल्याचे दिसते. सत्ता राखण्यासाठी संघटनेची बांधणी, बूथ पातळीवरील नियोजन आणि केंद्रीय नेत्यांचे दौरे यावर पक्षाचा भर आहे. सरकारने केलेली विकासकामे थेट मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहीर सभा आणि लोकार्पण सोहळ्यांची मालिका आखली जाण्याची शक्यता आहे.
निवडणुकीला तीन महिने शिल्लक असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. संतोष यांच्या या दौऱ्याला त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. पक्षाची संघटनात्मक स्थिती, कार्यकर्त्यांची तयारी आणि निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचा या बैठकांमध्ये आढावा घेतला जात असल्याचे समजते.
संतोष यांच्या दौऱ्यातील बैठकांमधून पक्षाच्या आगामी निवडणूक तयारीची दिशा स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना भाजपने बैठकांचा धडाका सुरू केल्याने पक्षाच्या पुढील रणनीतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










