LIVE UPDATES

शहरात पाण्याची कमतरता भासू देणार नाही

नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची माहिती : टँकरमुक्त वेंगुर्ल्याचा निर्धार कायम ठेवणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 12, 2026 20:02 PM
views 34  views

वेंगुर्ला : यंदा वेंगुर्ले शहरात पाऊस कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः एप्रिल-मे महिन्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेकडून आतापासूनच विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. तिलारी धरणाचे पाणी दाभोली नाक्यापर्यंत आले असून ते विविध भागांत पोहोचविणे, नैसर्गिक जलस्रोत विकसित करणे, पक्क्या बंधाऱ्यांची संख्या वाढविणे आणि नागरिकांना नळजोडणीद्वारे पाणी उपलब्ध करून देणे, अशा उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे. ‘टँकरमुक्त वेंगुर्ला’ हे नगरपरिषदेचे  ब्रीद कायम ठेऊन, शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शहरात पाण्याची कमतरता भासू देणार नाही असा ठाम विश्वास नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

वेंगुर्ला नगरपरिषदेची विशेष सभा आज आयोजित करण्यात आली होती. यानंतर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना बाबत माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक गौरी मराठे, प्रणव वायंगणकर, रिया केरकर, सुमन निकम, काजल कुबल, गौरी माईणकर, संदेश निकम, सचिन शेटये, सदानंद गिरप आदि उपस्थित होते. 

यावेळी बोलताना नगराध्यक्ष गिरप पुढे म्हणाले, वेंगुर्ला शहर मुख्य पाणी स्रोत म्हणजे निशाण तलाव आज ८० टक्के भरलेला हे पाणी मे पर्यंत पुरेल याची शाश्वती नाही. शहरात सुमारे एक हजार ते बाराशे विहिरी आहेत. या विहिरींच्या पाण्यावर अनेक नागरिकांसह शेतकरीही अवलंबून आहेत. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात विहिरींमध्ये दहा फुटांपर्यंत पाणी उपलब्ध असते; परंतु सध्या काही ठिकाणी पाणीपातळी २५ फुटांपर्यंत खाली गेल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई नसली, तरी आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे.

१० ते १२ नैसर्गिक जलस्रोत विकसित करणार

वेंगुर्ला परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचा विकास करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. परिसरात सुमारे १० ते १२ नैसर्गिक जलस्रोत असून, त्यापैकी काही खासगी जमिनीवर आहेत. संबंधित जमीनमालकांची संमती घेऊन या जलस्रोतांचा विकास करणे आणि आवश्यक त्या ठिकाणी तलाव निर्माण करण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे. या माध्यमातून पावसाचे पाणी साठवून त्याचा भविष्यात उपयोग करता येणार असल्याचेही नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले.

तिलारीचे पाणी शहरात आणणार

दाभोली नाक्यापासून बंदरापर्यंतच्या भागात नैसर्गिक ओहोळाचा अभाव असल्याने तेथे बंधारे बांधण्याची मर्यादा आहे. परिणामी, या भागातील नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तिलारी धरणाचे पाणी दाबोली नाक्यापर्यंत आले असून, यासाठी संबंधित यंत्रणेसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. करार पूर्ण झाल्यानंतर तिलारीच्या पाण्याचा वापर करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.

तिलारीची एक पाईपलाईन दाभोली नाक्यापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत गेली आहे. त्या टाकीत हे पाणी सोडू. तसेच दुसरी पाइपलाइन दाभोली नाक्यावरून नांदोस्कर मार्गे नारायण तलावाच्या विहिरीपर्यंत पाणी सोडून ते निमुजगा येथील टाकीत सोडून ते नागरिकांपर्यंत पोचवू असे नियोजन आहे. या पाइपलाइनसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री व जिल्हाधिकारी स्तरावर सकारात्मक सूचना मिळाल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळताच काम सुरू करण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न आहे.

पक्क्या बंधाऱ्यांची संख्या वाढविणार

वेंगुर्ला परिसरातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी कच्च्या तसेच पक्क्या बंधाऱ्यांवर भर दिला जात आहे. शहरातून जाणाच्या ओहोळवर दरवर्षी बंधारे घालण्यात येतात. यंदा पूर्वीच्या पाच बंधाऱ्यांऐवजी सुमारे १० ते १२ बंधारे उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे पाणी अडविण्यास आणि विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. सध्या सहा पक्के बंधारे असून, आणखी चार पक्क्या बंधाऱ्यांसाठी निधीची मागणी केली आहे.

निधी उपलब्ध झाल्यास यंदाच हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कच्चे बंधारे योग्य पद्धतीने बांधण्यात आले असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पक्क्या बंधाऱ्यांमधून पाणी ओसंडून वाहण्याची व्यवस्था असल्याने परतीच्या पावसामुळे बंधाऱ्यांचे नुकसान होऊ नये, याचीही काळजी घेतल्याचे गिरप यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक नागरिकाला नळजोडणीद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट

शहरातील काही नागरिकांकडे अद्याप नळजोडणी नसून ते केवळ विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशा नागरिकांनी नगरपरिषदेकडे नळजोडणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येणार आहे. नळजोडणीच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्याचे नगरपरिषदेचे उद्दिष्ट आहे.

तिलारी धरणाचे पाणी आणि स्थानिक तलावांमधील उपलब्ध पाणी यांचा योग्य वापर करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. यासाठी जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांनी नळजोडणी घ्यावी, यावर भर दिला जाणार आहे.

टँकरमुक्त वेंगुर्ल्याचे स्वप्न कायम ठेवणार

वेंगुर्ला शहर टँकरमुक्त करण्याचे स्वप्न नगरपरिषदेने २०१६ पासून पाहिले आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि कोणत्याही नागरिकाला पाण्याविना राहावे लागू नये, यासाठी सर्वंकष नियोजन सुरू आहे. नगरपरिषदेची संपूर्ण टीम आणि सर्व नगरसेवक या कामासाठी प्रयत्नशील आहेत.

पाणीटंचाईवर केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता जलस्रोतांचे संवर्धन, पाणी साठवण क्षमता वाढविणे, तिलारीच्या पाण्याचा पर्यायी स्रोत म्हणून वापर आणि प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीद्वारे पाणी पोहोचविणे, या उपाययोजनांमधून वेंगुर्ला शहराला कायमस्वरूपी दिलासा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. ‘टँकरमुक्त वेंगुर्ला’ हे उद्दिष्ट साध्य करून नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे, असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.