LIVE UPDATES

Devgad Fishing Boat Fire : देवगड समुद्रात ‘भगवती कृपा’ नौकेला आग

२१ खलाशी सुखरूप : इंजिनच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 12, 2026 20:14 PM
views 62  views
Fishing boat Bhagwati Krupa catches fire off the Devgad coast in Sindhudurg district; all 21 crew members rescued safely.

देवगड : देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या  संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीची ‘भगवती कृपा’ (नोंदणी क्रमांक IND-MH-4-MM-1614 ) ही नाव मासेमारी करत असताना या मासेमारी नौकेला इंजिनच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली. ही घटना सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास देवगड पवनचक्की समोर 12 ते 14 या दुर्घटनेमुळे बोटीवरील खलाशांमध्ये एकच धावपळ उडाली. मात्र, वेळेवर मदत मिळाल्याने नौकेवरील सर्व २१ खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मालवण येथील संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीची ‘भगवती कृपा’ ही नौका मासेमारीसाठी देवगड समुद्रात गेली असताना ही घटना घडली. नौकेच्या इंजिनमधील वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. समुद्रात नौकेला आग लागल्याचे समजताच बोटीवरील खलाशांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला मच्छीमारी करणाऱ्या लोकांनी वेळीच दुर्घटनाग्रस्त नौकेवरील सर्व २१ खलाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच एस सिंधुदुर्ग चार या स्पीड बोटीच्या सहाय्याने सागरी पोलिस दलाची टीम पाण्याचा पंप घेऊन घटनास्थळी दाखल झाली. सागरी पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद तांडेल, ए अरुण, एएसआय धुरी, एएसआय चंदन शिवे हे घटनास्थळी दाखल झाले.

देवगड समुद्रातील जळीतग्रस्त नौका देवगड बंदरात आणण्यासाठी स्थानिक मच्छीमारांकडून रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. घटनेची माहिती मिळतात देवगड बंदर येथे मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे आणि सागर सुरक्षा रक्षक योगेश फाटक, तसेच स्थानिक मच्छिमार देवगड बंदर येथे दाखल झाले. देवगड बंदर येथे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे अग्निशामक बंब देखील दाखल झाला होता.