..अखेर मुंबई पोलिसांनी जयसिंघांनीच्या मुसक्या आवळल्या !

गुजरातमध्ये रात्रभर चालला थरारक पाठलाग
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: March 21, 2023 15:17 PM
views 315  views

मुंबई : क्रिकेट बुकी अनिल जयसिघांनी याने अटकेपूर्वी पोलिसांना एकदा नव्हे तर दोन वेळा चकवा दिला होता. कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातच्या कलोलमध्ये रविवारी रात्री पोलिसांनी अटक केली होती. अनिल जयसिंघानी याला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी त्याची मुलगी अनिक्षा (वय २४) हिला अटक केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गेल्या महिन्यात २० फेब्रुवारीला लाच आणि खंडणीचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात गुरुवारी अनिक्षाला अटक करण्यात आली होती. आता जयसिंघानी आणि अनिक्षा या बाप लेकीला आज कोर्टात हजर करण्यात येईल. बुकी अनिल जयसिंघानी (वय ५६) याचे महाराष्ट्रातील अनेक बड्या राजकीय नेत्यांशी आणि मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. त्याचे शिर्डीमध्ये हॉटेलही असल्याचं सांगण्यात येतंय.



मूळचा उल्हासनगरमधील असलेला अनिल जयसिंघानी याच्यावर १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (सायबर सेल) बलसिंह राजपूत यांनी दिली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी बुकी अनिल जयसिंघनी याचे लोकेशन हे गुजरातमधील बार्डोली येथे पोलिसांना आढळून आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी जयसिंघानीचे लोकेशन हे सूरत दाखवत होते. पोलिस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा ते ठिकाण हे विमानतळाच्या जवळ होते. पोलिसांचा सुगावा लागताच अनिल जयसिंघानीने तिथून पळाला. गोध्राला पळून जात असताना पोलिसांनी अनिल जयसिंघानी याचा बराच काळ पाठलाग केला. अखेर त्याला रविवारी रात्री कलोल टोल नाक्यावर पोलिसांनी पकडले. महाराष्ट्रात नोंदणी झालेल्या कारमधून अनिल जयसिंघानी हा पोलिसांना सतत चकवा देत होता.



अनिल जयसिंघानी हा संपर्क साधण्यासाठी सीम कार्डचा उपयोग करत नव्हता. तो इंटरनेटवरून कॉल करत होता. त्याने वेगवेगळ्या लोकांच्या नावाने डोंगल घेतलेली होती. प्रत्येक ५ ते ६ दिवसांनी तो डोंगल बदलत होता. यामुळे आम्ही जयसिंघानीचा संपूर्ण वर्ष भराचा इंटरनेट कॉल डाटा तपासला. तिथून आम्ही तपासाला सुरुवात केली, अशी माहिती राजपूत यांनी दिली. CDR प्रमाणे IPDR वरून मोबाइल फोनवरून केलेल्या मेसेज आणि कॉल्स तपासता येतात.



पोलिसांनी अनिल जयसिंघानी याच्याकडून दोन मोबाइल फोन आणि दोन डोंगल जप्त केली आहेत. याशिवाय त्याचा नातेवाईक निर्मल जयसिंघानी याच्याकडून आणखी एक मोबाइल फोन आणि डोंगल जप्त केला आहे. तसंच त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या चालकाचाही फोन पोलिसांनी जप्त केला आहे.



जयसिंघानी हा १३ मार्चला शिर्डीत होता. पण त्याच्या मुलीला पोलिसांनी अटक केल्यानंतर तो गुजरातमध्ये पळाला. जयसिंघानी याला शोधण्यासाठी आणि पकडण्यासाठी पोलिसांची ५ पथकं नेमण्यात आली होती. पोलीस ५ दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. जयसिंघानी हा गुजरातमध्ये असल्याची तांत्रिक माहिती पोलिसांची तीन पथक बार्डोलीला रवाना झाली. पोलीस पोहोचली पण तिथून तो पळाला. यानंतर जयसिंघानी हा सूरतमध्ये असल्याचे पोलिसांना कळले. पण तिथूनही तो निसटला. भरूच आणि बडोद्या मार्गे कारने निघाला होता. तो गोध्राच्या दिशेने जात असल्याचा पोलिसांना संशय आला. आणि त्याला पोलिसांनी कलोल टोल नाक्यावर रविवारी रात्री पकडले. विशेष म्हणजे गुजरातमधील सूरत, भरूच, गोध्रा आणि बडोद्या पोलिसांनी मुंबई पोलिसांना सहकार्य आणि समन्वय साधला.