
कटक : भारतात इंडियन प्रीमियर लीगचा थरार धुमधडाक्यात सुरू झाला, पण ओडिशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रोमांचक क्रिकेटचा सामना सुरू होता. यादरम्यान पंचांनी 'नो बॉल'चा निर्णय दिला. अंपायरला 'नो बॉल' देण्याचा निर्णय इतका महागात पडला की एका तरुणाने धारदार चाकूने त्याची हत्या केली. हे घटना कटकमधील महिशिलंदा गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिसलंदा येथे ही क्रिकेटची स्पर्धा सुरू होती. ब्रह्मपूर आणि शंकरपूर हे दोन्ही संघ शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळत होते. मात्र ब्रह्मपूर संघाविरुद्ध पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने वाद सुरू झाला. पंचाच्या या निर्णयामुळे गावातील रंजन राऊत नावाचा तरुण संतापला. त्याने पंचाशी वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू वाद वाढत गेला.
दरम्यान, रंजन यांनी मैदानातच चाकू काढला आणि पंचांवर एकामागून एक हल्ला करण्यास सुरुवात केली. चाकूच्या हल्ल्यात पंच गंभीर जखमी झाला आणि तातडीने एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले.
उपचारादरम्यान पंचांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, खबरदारी म्हणून गावात सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.














