रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाजप उमेदवार जाहीर करणार ?

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 23, 2023 12:14 PM
views 73  views

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजस्थानमध्ये भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीची तयारी सुरू केली आहे. रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठापनेनंतर भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.  राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच पुढील महिन्यात भाजपाकडून उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात भाजपा आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू शकते सुत्रांनी यांसदर्भात माहिती दिली आहे.


विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी नवा नारा तयार केला आहे. ‘सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं’ असा नवा नारा आता भाजपकडून निवडणुकीदरम्यान देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर दोनदा बहुमत मिळवले आहे. 2014 मध्ये पक्षाने ‘अच्छे दिन आने वाले हैं’ असा नारा दिला होता. तर 2019 मध्ये ‘फिर एक बार मोदी सरकार’ या टॅग लाईनने प्रचार केला होता. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या नाऱ्यासह विजयाची हॅट्ट्रिक करणार का? हे पाहावे लागाले. परंतु पंतप्रधान मोदी यांनी जनता आपल्याला पुन्हा निवडून देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

दिल्लीत आजपासून भाजपा पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अधिकारी, प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपाच्या सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय बैठकीत अनेक मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच पुढील वर्षी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे, याचपार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपा राम मंदिराशी संबंधित कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे समजते.