
काबूल : अफगाणिस्तानमध्ये सोमवारी झालेल्या 6.3 रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपाने मोठी जीवितहानी झाली असून, मृतांचा आकडा 800 वर गेला आहे. 3 हजारांवर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे झालेल्या विध्वंसात आणि ढिगार्याखाली अडकलेल्या बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा मोठा आहे; परंतु भूकंपाचा परिसर दुर्गम असल्याने बचाव पथके अजूनही घटनास्थळी कार्यरत आहेत.
6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप नंगरहार प्रांतातील जलालाबादजवळ झाला. या मुख्य धक्क्यानंतर, भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळच सुमारे 140 कि.मी. खोलीवर 4.7 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला.
2023 नंतरचा सर्वात विनाशकारी भूकंप
सोमवारचा भूकंप हा 2023 नंतर या प्रदेशात झालेला सर्वात विनाशकारी भूकंप आहे. दोन वर्षांपूर्वी, या प्रदेशात 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता आणि त्यानंतर तीव्र धक्के बसले होते. तालिबानच्या म्हणण्यानुसार, त्या भूकंपात सुमारे 4,000 लोकांचा मृत्यू झाला होता. तथापि, संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, किमान 1,500 लोकांचा मृत्यू झाला होता.